Monday 27 February 2017

उर्मिला पवार यांचं 'आयदान'

काही वर्षांपासुन हे पुस्तक वाचायचे मनात होते. शेवटी ते लायब्ररीतून आणून नुकतेच वाचून संपवले. या पुस्तकाविषयी काय लिहावे? खूप खरं-खुरं, अगदी मनाला भिडणारं, बेधडक, जराही आव न आणता केलेलं आत्मकथन. मराठीत 'मेम्वार' (Memoir) या साहित्य प्रकारात मोडणारे लेखन फार नाही. आत्मकथन म्हणजे आत्मचरित्र नव्हे. आत्मचरित्रात अनेकदा अनुभवांबद्धलचे रिफ्लेक्शन नसते. आपल्या अनुभवांना पुन्हा एकदा जगल्यासारखे ते लिहिले जात नाही कारण संपूर्ण जीवनाच्या पटात त्या विशिष्ट अनुभवाचे स्थान दिसेनासे होऊ शकते. या उलट Memoir मध्ये छोट्या कालखंडाबद्धलचे आयुष्य मांडले गेले असल्याने तिथे या अनुभवांचे विस्तृतपणे आकलन लेखकाला करता येते. अर्थात हे पूर्णतः माझं मत आहे. फार तुलना किंवा फरक करण्याएवढी मेम्वार किंवा autobiographies  मीही वाचल्या नाहीत. पण उर्मिला पवार यांचं हे छोटेखानी 'आयदान' मला खूप आवडलं. त्यात खूप मोकळेढाकळेपणा आहे, तो आवडला. 
जीवन अनंत आहे. अनंत! तुम्ही त्या जीवनाचा किती आणि कश्या प्रकारे अनुभव घेऊ शकता? 'अनंत' हा शब्दही जीवनाला पुरणारा नाही. अथांग, अमर्याद! काय वाट्टेल ते म्हणा पण तुम्ही जीवनाच्या अनंत रचना एका फुटकळ, अतिशय मर्यादित आणि अतिशय थोड्या काळाच्या आयुष्यात कधीही अनुभवू शकत नाही. मग ही जीवनाची रूपं तुम्हाला कशी दिसतील? जीवनाचा अवाका (अतिशय थोडा : वन झिलीएन्थ ड्रॉप इन ओशन) तुम्हाला थोडाफार का होईना कसा बघता येईल? हे फक्त पुस्तकंच करू शकतात. चांगली पुस्तकं. या पुस्तकाच्या कोलायडोस्कोपला डोळा लावावा. ते तुम्हाला जीवनाच्या अनंत स्थिती दाखवील. पण पुस्तकही तसं हवं, अनेक डायमेन्शन्सचं... , ज्यातून लेखकापेक्षा कितीतरी वरच्या पातळीवर असतो तो जीवनानुभव... आणि लेखक फक्त तिथे माध्यम असतो व्यक्त करणारा म्हणून फक्त. अशा लेखनातून लेखक दिसत नाही..तर  जीवनाचं रूप दिसतं. त्या लेखनाशी तुम्ही एकरूप होऊ शकता आणि असं लेखन तुम्हाला जीवनाची तुम्ही न बघितलेली रूपं दाखवू शकतं. असं लेखन करणं मुळीच सोपं नाही. भल्याभल्याना ते जमलेलं नाही. असं लेखन आणि अशी पुस्तकंच तुम्ही न जगलेल्या जीवनाचं दर्शन तुम्हाला देऊ शकतात. उर्मिला पवार यांच्या 'आयदान' सारखी पुस्तकं. 
या पुस्तकाला अनेक डायमेंशन्स आहेत. म्हणूनच हे पुस्तक जीवनदर्शी आहे, केवळ दलित, स्त्रियांची दुःखं, अपरिमित गरिबी यांच्यावरचं नुसतं भाष्य नाही, अन्यायाविरुद्धचा तळतळाट नाही, सोसलेल्या दुःखाचा सोस नाही, फक्त शांत, mature narration आहे. मी स्वतः खेड्यात आयुष्याची पंधरा वर्षं वाढले. आम्हाला जातीयवाद इ. चा काही प्रश्न नव्हता, आणि बऱ्यापैकी सुखवस्तू कुटुंबात मी वाढले पण तरीही ग्रामीण जीवनाशी, आजच्या शहरातल्या रस्त्याकडेला ओघळलेल्या झोपडपट्ट्या, वस्त्यांतून दिसणारं एकदम डोळ्यात बोट घालणारं गरिबीचं विदारक दृश्य गावात कधी नजरेस पडणार नाही. पण ग्रामीण भागात एक प्रकारची जी गरिबी आहे. जे सुख-चैन-अभावी जीवन आहे, ते मी फार जवळून पाहिलं आहे. ते मला 'लागलं' ही आहे. त्यामुळे या पुस्तकातून काहीतरी अतिशय वेगळं, भयंकर विदारक काही वाचतेय असं मला वाटलं नाही. अर्थात लेखिकेने ते तसे 'सेनसेशनल', उगीचच सनसनाटी अजिबातच लिहिलेलं नाही. गरिबी आणि 'स्त्री' यांची दुःखं कुठल्याही समाजाला लागू आहेत. आणि सर्वात महत्वाचं या पुस्तकांचं हेच यश आहे की यातली बरंचसं जीवन आपणही पाहिलं, अनुभवलं आहे, ते आपणही जगलो आहोत असं पुस्तक वाचताना वाटतं. त्याचबरोबर आपण न अनुवभलेली पराकोटीची दुःखं, आयुष्याने लचके तोडून असहनीय केलेलं जीवनही आपण लेखिकेच्या बरोबर अनुभवतो. 'आयदान' ची सुरवात छोट्या छोट्या गोष्टींनी होते, हलक्याफुलक्या, काही नामुष्कीच्या, काही अतिशय , काही आनंदाच्या, समाधानाच्या , मजेशीर, या सर्वांचा पट शेवटी शेवटी इतका भेदक होत जातो की शेवटच्या पानांनंतर आपण उर्मिला पवार यांच्या मनातून जीवनाच्या खोल तळाशी दडलेल्या अनंत स्थिती पाहू लागतो नकळत. शेवटच्या पानांतील अनेक चळवळींबाबतची खंत, आयुष्यातील अत्यंत कठीण प्रसंगांचा स्वीकार हे लेखिकेच्या या कथनातील अत्त्युच्च शिखर.
 Memoir मधील अनुभवकथनात 'सत्य'(Truth) ही गोष्ट पडताळून (proofs वैगेरेवरून) पाहण्याची नाही तर त्यातले सत्य तुम्हालाही भिडते , कुठेतरी खोल जाणवते ही यावर ते अवलंबून आहे. एक memoir किती सत्य असते हे त्याच्या वाचनाने तुम्हाला काय वाटले, त्या वाचनातून, वाचलेल्या शब्दांतून तुम्ही काय अनुभवले यातून तुमच्यापुरते ठरवता येऊ शकते. त्या दृष्टीने मला हे आत्मकथन अतिशय सखोल सत्याला भिडणारे वाटले. जातीयतेच्या संघर्षाला लेखिकेला लहानपणापासून तोंड द्यावे लागले आणि त्याबद्धलचे काही प्रसंग तिने लिहिले आहेत. पण कुठेही कटुता नाही. विखार नाही. दलित आणि त्यातून स्त्री म्हणजे अजूनही विदारक असा लिहिण्याचा थिम असला तरीही कुठेही रोष, शेरेबाजी नाही. जे ती जगली ते तिने खोलवर अनुभवले आणि त्यातून जे वर आले ते तिने मांडले जे अतिशय निर्मोह , अतिशय पारदर्शी जीवनाचे अंतरंग आहेत.. त्यामुळेच जातीयता, स्त्रीवाद, यांच्याबद्धल भाष्य असूनही हे पुस्तक त्यांच्या खूप पुढे जाते. त्याची पातळी अनुभवलेखनामध्ये खूप वरची ठरली आहे. महेश एलकुंचवार यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे की जर अनुभव घेणारा अनुभवापेक्षा स्वतःला मोठा समजू लागला तर ते अनुभवकथन (लेखन) फसते. असे लेखन universal होऊ शकत नाही कारण लेखक मध्ये 'मी' 'मी' करून लुडबुडत असल्याने तो अनुभव  वाचकाला कधीच घेता येत नाही. उर्मिला पवारांचं लेखन म्हणजे 'मी पहा कशी, एवढं सोसलं, एवढं भोगलं असं साळसूदपणे केलेलं लेखन तर नाहीच! पण त्याहीपुढे काही लोक जाणूनबुजून 'मी हे भोगलं पण मी हे सांगत नाही कारण माझ्यासाठी ते काही एवढं मोठं नाही' असा जो खोट्या humbleness चा आव आणतात, त्याचा लवलेशही त्यांच्या लेखनाला नाही.  
'आयदान' हा शब्द किती सुंदर आहे, आणि तेवढ्याच सुंदर असतात बांबूच्या पट्ट्यांनी विणलेल्या सुपल्या, रोवळ्या. त्यावरची वीण इतकी कलात्मक की पाहत राहावं. घट्ट, एकमेकात गुंतलेली, अतिशय सूक्ष्म छिद्र असलेली. लहानपणी या सुपल्या, रोवळ्या, डाळी (चटई), कणगी आमच्या गावच्या घरी बघितली आहेत. या पुस्तकावरच्या चित्रात स्त्रीचा चेहराच बांबूच्या पट्ट्यांनी  विणलेलं 'आयदान' झाला आहे. हे 'आयदान' म्हणजेच जीवन नव्हे का? लेखिकेच्या बाबतीतही तर हे 'आयदान' तिच्या आयुष्याचाच पोत आहे. पण हा पोत खरा सर्वांच्याच जीवनाचा नाही का? या जीवनाच्या एकमेकात गुंतलेल्या पट्ट्यांमधलं साम्य आपल्याला जेव्हा लेखिकेच्या लेखनात जाणवतं तेव्हा आपण या पुस्तकात हरवून जातो. त्यामुळे मला हे पुस्तक फक्त दलितवादी, स्त्रीवादी असं न वाटता जीवनवादी अधिक वाटतं. लेखिका पुस्तकाच्या शेवटच्या परिच्छेदात म्हणते 'माझ्या आयुष्याचं हे 'आयदान' त्याची वीण वाचणाऱ्याला काय देणार आहे? फार फार तर त्याला त्याच्या जगण्याची आठवण करून देईल, किंवा एखाद्याला ते फेकून द्यावंसंही वाटेल. पण इथल्या प्रत्येक व्यक्तीचं जगणं हे एक सामाजिक वास्तव आहे एवढ्या दृष्टीनं माझ्याही जगण्याकडे त्याने पाहावं ही अपेक्षा आहे'
त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची भाषा. ती नुसती मराठी नाही तर रत्नागिरी-चिपळूण कडची-, सिंधुदुर्गाची अश्या अनेक बोलीभाषांनी आंजारली गोंजारलेली ती भाषा आहे. अतिशय वेढून टाकणारा ऎसपैसपणा त्या भाषेत आहे. किती वेगवेगळे चपखल बसणारे ग्रामीण भाषेतील शब्द, बोलीभाषेतील शब्द, यांचा सढळ हस्ते या पुस्तकात वापर झाला आहे. माझे बालपण कोकणात (सिंधुदुर्ग येथे) येथे गेले. त्यामुळे मला हे सर्व लेखन वाचताना खूपच मजा आली. 
या पुस्तकाविषयीखूप वाटलं. असं वाटायला लावणारं हे पुस्तक. 
 
या पुस्तकातील लक्षात राहिलेल्या काही ओळी :
'आई' या शब्दामागच्या भावना जाणून घेण्यासाठी लेखिका आपल्या आईला विचारतात. त्यांची आई अशिक्षित (लोकार्थाने जग न पाहिलेली) . पण ती सांगते 'आई होनं म्हणजे सती जानं बाय सती... !!'  
आयुष्य कसंही येवो, ते निर्लेप मनानं स्वीकारण्याची हिंमत मात्र मला माझ्या जगण्यानं दिली आहे.

Sunday 15 January 2017

निसर्गोत्सव


'निसर्गोत्सव' हे दुर्गा भागवतांचे अतिशय छोटे आणि छान पुस्तक वाचनात आले. हे पुस्तक ९६ सालातील आहे. यातील काही लेख नंतर 'भावमुद्रा' या पुस्तकात समाविष्ट केले गेलेले आहेत. दुर्गा भागवत म्हणजे अशा लेखिका ज्यांच्या लेखणीतून सरस्वतीने साक्षात स्वतःच शाई बनून शब्दरुपी पाझरावे. इतकं सहज, सोपं आणि सुंदर ललित लेखन मराठीत क्वचितच कुठे आढळेल. म्हणून त्यांची पुस्तकं वाचणं म्हणजे शब्दानंद अनुभवणं. हे पुस्तकही तसंच आहे. याच्या प्रस्तावनेत त्या म्हणतात कि 'या पुस्तकाचे नाव मी दिलेले नाही. माझ्या संपादकांनीच ते मुक्रर केले आहे. संपादक माझे वाचक आहेत आणि साहित्य निर्मितीत वाचकाचाही सहभाग असतो असे मानणारी मी आहे.'

दुर्गा भागवतांच्या बहुतेक लेखांत निसर्ग असतोच, किंबहुना निसर्गाला साथीला घेऊनच त्या लेखन करतात. प्रत्येक गोष्ट इतक्या रसिकतेने अनुभवणे आणि त्याचबरोबर अनेक ठिकाणचे संदर्भ देऊन वेगवेगळ्या गोष्टींशी त्याचा संबंध दाखवणे ही  त्यांच्या लेखनाची खासियत आहे. त्यामुळे त्यांचे लेखन ललित असूनही अनेक स्तरांना स्पर्शून जाते. त्यांचे अभ्यासपूर्ण लेखन तर समृद्ध आहेच पण त्या स्वतःच्या अनुभवांविषयी देखील तितक्याच समर्थपणे लिहितात. 'वाळूतील पाउले' या लेखाबद्धल आपला सानेगुरुजींबद्धलचा अनुभव त्या प्रस्तावनेत लिहितात. साने गुरुजींनी त्यांना त्यांच्या 'साधना' अंकासाठी लेख लिहिण्यावर वारंवार सुचवले होते. पण तसा लेख त्या काही लिहू शकल्या नव्हत्या. मग एके दिवशी मात्र त्यांना असा भास होऊ लागला की साने गुरुजी लेखासाठी धरणे धरून बसले आहेत आणि त्यामुळे  त्या लिहू लागल्या. लेख रात्रंदिवस बसून लिहीत होत्या. लेख साने गुरुजींना पाठवूनच त्या स्वस्थ बसल्या. गुरुजींचे लेख  पोचल्याचे पत्रही आले. त्यात गुरुजींनी 'वाळूतील पाउले' ऐवजी 'काळाची पाउले' असे लिहिले होते. ते पत्र ज्या दिवशी दुर्गाबाईंकडे पोचले त्याच्या  दुसऱ्या दिवशीच साने गुरुजींनी आत्महत्या केली. असा विलक्षण योगायोग असलेला अनुभव त्या सांगतात. तसेच आणखी एका 'वात्सल्याचा अविष्कार' या लेखाबद्धलही त्या लिहितात. हा लेख प्रस्तुत पुस्तकात नाही. स्वतःचे पिल्लू गमावलेले एक माकडाचे जोडपे पोर मिळवण्यासाठी (मग ते कुठल्याही प्राण्याचे असो) कसे धडपड करते, या स्वतः बघितलेल्या अनुभवावर त्यांनी हा लेख लिहिला आहे. लेखातले माकडाचे जोडपे मांजराचे पिल्लू घेऊन त्याला वाढवू लागले. ते पिल्लूही जेव्हा मरून गेले तेव्हा दुर्गाबाईंच्या घरातीलच त्यांच्या आत्याची तान्ही मुलगी पळवण्याचाही त्या जोडप्याचा बेत होता. पण घरातल्या खंड्या कुत्र्यामुळे तो बेत सफल झाला नाही. 'श्रावणातल्या दुपारी' या लेखाविषयी त्या लिहितात की अळंबी(भूछत्र) त्यांनी लेख लिहिताना खाल्ली नव्हती, पण लेख जेव्हा या पुस्तकातून प्रकाशित होत आहे तेव्हा मात्र त्यांनी अळंबीची चव चाखली होती. ज्या काश्मीरच्या हॉटेलमध्ये त्यांनी अळंबीचा आस्वाद घेतला त्याबद्धल त्या आपला अनुभव सांगतात. 

शेवटी त्या म्हणतात 'इतक्या वर्षांपूर्वीचे हे लेख आहेत. त्यात निसर्गाला धरून  येणाऱ्या सांस्कृतिक जीवनाचेही दर्शन आहे. निसर्ग म्हणजे प्रकृती. जे असते ते. किंवा मूळ स्वरूप आणि संस्कृती म्हणजे उपयोगाच्या दृष्टीने घडवलेली कर्मसृष्टी. त्यामुळे हे लेख वाचल्यावर संपादकांनी केलेली निवड मला स्वीकारार्ह वाटते.'

'वाळूतील पाउले' या लेखात संध्याकाळच्या वेळी समुद्र किनाऱ्यावर भेटलेल्या तांदूळमणी वेचणाऱ्या एका गरीब लहान मुलीवर त्या लिहितात. तिच्या विषयी, तांदुळमण्याविषयी लिहितानाही सभोवतालचा निसर्ग त्यांच्या नजरेतून सुटत नाही. थंडीच्या मोसमातील संध्याकाळच्या वेळचा समुद्रकिनारा त्यांना आल्हाददायक वाटत नाही. त्या लिहितात 'संध्याकाळच्या वेळी विशेषतः कृष्णपक्षात पाण्याचा शेजार नेहमीच भयाण वाटतो, मग आता तर क्षितिजाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत भरलेला समुद्र पातळ काळोखातून जसा काही हिसकाळून निघत होता. लाटांचा तोच आवाज रात्रीच्या हुंकाराप्रमाणे वाटत होता. सारी पंचमहाभूते जणू काही सृष्टीपासून अलग होऊन दूर दूर आपल्या स्वतःच्या प्रेरणेने वावरत होती. स्वतःची भाषा बोलत होती. मानवाविरुद्ध कट करत होती. नेहमीच्या परिचयाचे ते स्थळ, पण किती वेगळे, अनोळखी वाटत होते.' निसर्गाच्या या अवस्थेत त्यांना खूप उदास वाटतं त्यातूनच त्या वाळू तुडवत चालल्या होत्या. चालत चालत त्या अश्या ठिकाणी आल्या जिथे मुलं खेळत होती. तिथे शंख, शिंपले आणि तांदुळमण्यांची पखरण पडली होती. तांदूळमणी म्हणजे नक्की काय हे मला माहित नाही. कदाचित ते मी बघितले आहेत पण यांनाच तांदुळमणी म्हणतात हे मला माहित नाही. या तांदुळमण्यांविषयी त्या लिहितात 'लहानपणी कितीतरी तास तांदुळमणी वेचण्यात आम्ही घालवत असू, बाहुलीचे दागिने करायला तांदुळमण्यांसारखे मणी नाहीत. किती नाजूक, किती पांढरे!  वाळूत बसले की नकळत माझे हात तांदुळमणी टिपू लागतात आणि आजूबाजूचा विसर पडतो.' तिथे वाळूत बसून लहान मूल होऊन त्या तांदुळमणी वेचू लागल्या, तेव्हा त्यांच्याजवळ एक सावळी, किडकिडीत, आठनऊ वर्षांची मुलगी येऊन त्यांच्याशी जुनी ओळख असल्यासारखी बोलू लागली. आपली कहाणी त्यांना सांगू लागली. लहानपणी आईवडिलांचं छत्र हरवल्याने तिच्या बोलण्यात प्रौढपणाची झाक होती. चुलत्यांच्या घरी त्यांचा मुलगा सांभाळत ती राहत होती. शाळा नाही. अपुरं अन्न. गाल बसलेले. ओठ सुकलेले. वेणीफणी कित्येक दिवसात न झालेल्या अश्या त्या मुलीचे डोळे मात्र चमकदार होते. खूप दुःखे पचवून समंजस झालेले होते. तांदुळमण्यांचीच काय ती दौलत तिच्यापाशी होती. ती तिने लेखिकेला देऊ केली. तिने आपली गोष्ट लेखिकेला सांगितली. तिला आणि त्या छोट्या मुलाला पुरीभाजी, गंडेरी , पेपरमिंट असं बरंच काही लेखिकेने खाऊ घातलं. 'उद्या तुमच्या भाचीला पण आणा, पुष्कळ तांदुळमणी देईन तुम्हाला' असं सांगून ती मुलगी कडेवरच्या मुलाला घेऊन निघून गेली. त्यानंतर मात्र अनेकदा संध्याकाळी चौपाटीवर शोधून सुद्धा ती मुलं कधीही सापडली नाहीत. जास्त खाल्लं म्हणून त्यांचं काही बरंवाईट तर झालं असावं की लोकांकडून घेऊन खाल्लं म्हणून शिक्षा झाली असावी अशी विचित्र हुरहूर दुर्गा भागवतांच्या मनाला मात्र कायमची लागून राहिली.

'श्रावणातल्या दुपारी' हाही एक सुंदर लेख. निसर्गाचे, निसर्गात घडणाऱ्या प्रत्येक साध्या साध्या गोष्टीचे तरल पण निर्विकार वर्णन करणारा रिपोर्ताज. या लेखातला प्रत्येक शब्द निसर्ग साक्षात समोर मांडणारा. ध्वनी, प्रकाश यांची बदलते रुपे. पावसामुळे, वाऱ्यामुळे, उन्हामुळे निसर्गात होणारे सूक्ष्म बदल. झाडे, पाखरे यांच्या हालचाली यांचे अतिशय सुंदर अवलोकन या लेखात आहे. 'केळीच्या मधल्या कोंबाची सुरळी सोडली तर बाकीची पाने वाऱ्यापावसाने फाटून फाटून त्यांच्या चिरफळ्या उडाल्या होत्या.' 'केळीच्या बुंध्याशी असणाऱ्या गुलबक्षीच्या झाडावरच्या कळ्याही हा उन्मत्त नाच आ वासून पाहू लागल्या होत्या.' माका, राजहंसाचा वाटोळ्या सॅटिनसारख्या रेशमी पानांचा आंबट पाला, ओव्याची पाने, टाकळा अश्या खेड्यातील भाज्यांवर देखील लिहिले आहे. पावसाळ्यात उड्या मारणाऱ्या बेडक्या त्यांना त्रास देऊन जीव रमवणारी उनाड पोरे यावरही लिहिले आहे. तसेच भूछत्रांवरदेखील अतिशय छान लिहिले आहे. 'मुचकुंद (कनकचंपा) या झाडाच्या उथळ ढोलीत केव्हातरी त्यांचे बी पडून ती उगवली होती. शेवंतीसारख्या पिवळ्या रंगाची.' पण त्या उनाड पोरांनी ती सुंदर भूछत्र भराभर तोडली, हुंगली, आणि शेवटी कोळपून गेलेली ती छत्रे फेकून दिली. कर्नाटकात भूछत्रांना 'अणिबे' आणि कोकणात 'अळमी' असे म्हणतात.
कावळ्यांची घरटी पावसाळ्यातच बनतात. मग त्यातल्या पिलांच्या जगण्याची धडपड पावसाळ्यात पाहायला मिळते त्याचेही अतिशय निर्विकार वर्णन केले आहे. 'सुरुपापेक्षा कुरुपाचे मरण पाहणे अति दुःसह असते' 'पावसाळ्यात विशेषतः श्रावणात, अशी दुबळी पोरे कितीतरी मरतात. लायक असेल त्यालाच जगू देण्याचा पाखरांचा कायदा मोठा कडक असतो. अश्या श्रावणातल्या दुपारी कटू प्रसंगही दिसतात, आणि मधेच आपले शंखाचे भस्मी रंगाचे घरकुल पाठीवर घेऊन, शिंगे रोखून संथ गतीने सरकत चाललेली अळूच्या पानावरची गोगलगाय देखील दिसते. तिच्या अंगातून निघणारा चिकट द्रव सरपटत गेलेल्या मार्गावर सांडलेला असतो आणि त्या तेलाच्या तवंगाप्रमाणे दिसणाऱ्या पट्ट्यात सूर्यकिरणांमुळे इंद्रधनुष्याचे रुंग उमटलेलेही दिसतात.


'ऊन-पाऊस' ही एका चिमणीच्या केलेल्या अवलोकनाची दर्दभरी कहाणी. दुर्गा भागवतांनी त्यांच्या खास मोजक्या पण चटका लावणाऱ्या शब्दात सांगावी अशी. चिमणी या पक्ष्याशी अतिशय सख्य असल्याने मला एकदा वाचल्यानंतर हा लेख पुन्हा वाचावासा वाटेना. हा लेख 'भावमुद्रा' मधेही समाविष्ट आहे, आणि तो पूर्वी वाचला होता. क्षणात ऊन आणि क्षणात पाऊस, तसे क्षणात आनंद आणि क्षणात दुःख असे त्या चिमणीचे जगणे. कोकणातला पावसाळा असा असतो, क्षणात सोनेरी ऊन आणि क्षणात काळवंडून टाकणारे आभाळ.

'मुंबईत वसंतागम' हा लेख म्हणजे दुर्गा भागवतांची खासियत. इतकी सौन्दर्यदृष्टी त्यांना लाभली होती की मुंबईसारख्या बकाल शहरातील वसंत ऋतूचे आगमन त्या टिपतात. लेखाची सुरवातच अतिशय सुंदर आहे. त्या लिहितात, 'मुंबईतील झाडे, काय आहे त्याबद्धल लिहिण्यासारखे असे पुष्कळ जण म्हणतील. पण याच मुंबईत माझ्या डोळ्यांनी झाडांची सुंदर चित्रे बघितली आहेत.' 'ऋतूंमधला बदल म्हणजे निसर्गातील क्रांती व उत्क्रांती, एक ऋतू पालटून जेव्हा दुसरा येतो तेव्हा वरचे आकाश, खालची जमीन, अवतीभवतीचे वातावरण नित्य नवा रंग धारण करते. या नव्या रंगातच आमच्या शहरी झाडापानांचा कायापालट होतो.'
किती झाडांवर आणि त्यावर येणाऱ्या पक्षण्यावर त्यांनी लिहिले आहे.
आंबा : आंब्याचे मोहोर आणि त्यावर घोंगावणाऱ्या केंबरी (केंबरी हा एक अतिशय सूक्ष्म कीटक असतो, मालवणीत त्याला किमरु म्हणतात) आणि लांब सुईसारख्या चोचीने मोहोर टिपणाऱ्या मिराळ्या चिमण्या (मिराळ्या चिमण्या म्हणजे फ्लॉवरपेकेर्स की सनबर्ड?)
बदामाचे झाड: पळसासारखी मोठी लांबट पाने, पिकून गाळताहेत, पण रंग किती सुंदर लाल! त्याचा कोवळ्या पानांनी सुद्धा हेवा करावा. ठिकठिकाणी गळत्या पानांच्या जागी नव्या पानांचे पोपटी लालसर, निरांजनाच्या ज्योतीप्रमाणे दिसणारे मोठेमोठे कळे जोरात वर येत आहेत.
शेवगा पांढऱ्या फुलांनी भरून गेलेला, आंबा, फणस, शेवगा यांच्या मागचे गुलमोहराचे झाड त्यामानाने कितीतरी साधे दिसत आहे.
'शिरीष या झाडाची पाने सपासप गळून पडताहेत. आणि लालसर रंगाची सुंदर कोवळी पालवी त्या झाडाच्या अंगाअंगावर फुलत आहे. एप्रिल महिन्यात हि झाडे जांभळट, गुलाबी, नाजूक फुलांनी बाहेरून जातील.;'   शिरीषच्या झाडाच्या ढोलीत राहणाऱ्या पोपटांबद्धल त्या लिहितात 'आजूबाजूला एकवेळेला निदान पन्नास-साठ तरी पोपट दिसतात. प्राणाला पोपटाची उपमा का देतात, 'मायेचा हिरवा रावा' का म्हणतात हे मला या झाडावरचे पोपट पाहिले तेव्हा चांगले कळून आले'. पाखरांमुळे झाड जिवंत वाटते असेही त्या लिहितात. पोपटांच्या पिलांना बोक्यापासून वाचवण्यासाठी कावळे गोंगाट करून मदत करतात पण हेच कावळे पोपटाची पिले जरा घरट्यातून बाहेर आली कि केव्हा मारू केव्हा नको असे करतात. या कावळ्यांच्या विचित्र मैत्री/शत्रूत्वाच्या विसंगत वागण्याबद्धलही त्यांनी लिहिले आहे.
मार्चच्या अखेरीस फुलणारा पळस, पांगारा या झाडांचे, त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण फुलांचे त्या वर्णन करतात. ''पीलक' (म्हणजेच 'हळद्या' (Black headed Oriole)) ह्या पक्ष्याने पळसाच्या झाडावर घरटे बांधलेले आहे. चिनी जास्वंदीची अर्धोन्मीलित असणारी फुले आणि त्यावर येणारा काळसर लहान पक्षी म्हणजे फुलचूखी (हनीसकर). त्याचे केलेले निरीक्षण त्यांनी शब्दात असे मांडले आहे. ' बसला तो जास्वंदीच्या झाडावर! फुलाचे नळकांड्यासारखे खालच्या बाजूस असणारे तोंड. त्या तोंडात खालच्या बाजूने मान उंचावून आपली लांब टाचणीसारखी बारीक चोच या पक्ष्याने खुपसली आणि तो मध पिऊ लागला. फुलपाखरे मध चाखतात. पण फूलचूखीने घेतलेला हा मधाचा आस्वाद मी कधीच विसरणे शक्य नाही. 'मध चाखावा फुलपाखरांनीच, पक्ष्याला त्याचे काय होय?' असे कविवचन आहे. पण फुलचूखी मधाचा घास कसा घेते हे एकदा तरी ज्याने पहिले आहे तो ते दृश्य विसरणे शक्य नाही.' 'एप्रिलच्या भरात गोविंद पक्षी(थ्रश ? हा कुठला पक्षी? ) , तांबट, गावठी बुलबुल या सगळ्यांची संगीतशाळा भरते. प्रत्येकजण आपले आकर्षण वाढवतो आहे, गातो आहे, आपली जात वाढवण्याची धडपड करतो आहे. '


'गुलमोहराच्या आठवणी' या लेखात त्या आपल्या स्मृतीतील गुलमोहराच्या झाडांविषयी लिहितात. ऐन वसंतात जेव्हा इतर झाडे कोवळी पालवी घेऊन नटलेली असतात तेव्हा हे झाड काट्याकुटक्यांचा आपला देह घेऊन उभे असते. त्यातही असलेल्या सौदर्यांविषयी त्या लिहितात. 'त्याच्या त्या काळ्या कबऱ्या फांद्या,  निळसर भुरक्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर किती खुलून दिसतात! सूक्ष्मतेने पाहणाऱ्या खेरीज कुणाला कळणार नाही. चिनी चित्रकारांनी निष्पर्ण वृक्षांचे कलात्मक चित्रण करण्यात सिद्धी मिळवली आहे. गुलमोहराच्या उन्हाळी रूपाचे हे उघडे-नागडे चित्र पाहिल्यानंतर मला त्या चित्रातले माधुर्य थोडेसे समजू लागले.
उन्हाळयाच्या अखेरीस आणि पावसाळ्याच्या सुरवातीला पूर्ण फुललेला बहारदार लालभडक, ऐन पावसाळ्यात आणि अखेरीस पूर्ण हिरवागार आणि ऐन वसंतात निष्पर्ण अशी रूपे घेणारा गुलमोहर मलाही आगळावेगळाच वाटतो. त्याच्याविषयीच्या अनेक आठवणी दुर्गाबाईंनी सांगितल्या आहेत. त्यातल्या काही म्हणजे , गुलमोहराच्या शेंगाना तरवारी समजून खेळले जाणारे पोरांचे खेळ, गुलमोहराच्या टपोऱ्या कळ्या बाहुलीच्या लग्नात नारळ म्हणून वापरल्या जायच्या, पाकळ्यांचे ठसे हातावर काढून गोंदण्याचे, मेंदीचे सुख अनुभवले जायचे, कळीच्या आतले पराग म्हणजे लहान मुलांच्या दुकानातील स्वस्त केशर, सर्वात मोठे विलोभन म्हणजे लाल पराग आणि त्याच्या माथ्यावरचा बडीशेपेच्या आकाराचा पिवळा पागडीसारखा तुकडा लहान मुलांना लढाऊ शिपायांसारखा वाटतो , या परागांची झुंज लावून कुठल्या शिपायाची पगडी उडते ते बघणे असा लहान मुलांचा खेळ, अश्या अनेक आठवणी. या सर्वच आठवणी सुखद नाहीत काही दुःखद पण आहेत. जशी गुलमोहराच्या झाडाखाली राहणारी वेश्या आणि एक दिवस वाधळात उन्मळून पडलेले ते झाड, त्यानंतर वेश्येची आणि तिने आश्रय दिलेल्या कुत्र्यांची झालेली वाताहतही आहे. अत्यंत गलिच्छ अशा शौचकूपांच्या गर्दीत वाढलेले आणि दार मोसमाच्या वेळी जे काही आहे त्यावर सृष्टिनियमाला मानून पुष्पवृष्टी करणारे करूण झाडही दुर्गाबाईंना दिसते. आणि त्या म्हणतात 'अशा कर्मयोगाचा मला धाक वाटतो, त्या झाडामुळे त्या गलिच्छ ठिकाणालाही शोभा आली आहे याचा विसर पडतो आणि मन उदास होते' अशा या झाडाखाली एक भिकारीही मेला तेव्हा त्याच्यावरही गुलमोहोर आपल्या शिळ्या पाकळ्या टाकीत होता.


'सिध्देश्वरच्या तळ्यातील कमळे' या लेखात त्या सोलापूर येथील सिद्धेश्वराच्या देवळासमोर असलेल्या तळ्यातील मोठ्या कमळांविषयी लिहितात. मोठी फुले म्हणजे कमळ, लहान फुले म्हणजे लिली असे त्या सांगतात. हे सिद्धेश्वराचे तळे नंतर बुजवले गेले आणि कमळेही गेली, त्याबद्धल त्या हालहाल व्यक्त करतात. कमळाचे तिचे गाढले गेलेले बी शोधून कुणी ती कमळे पुन्हा जिवंत करावीत असा आग्रह त्या धरतात. 'मला वाटते, सारखे वाटते, की आजही तळ्याच्या ठिकाणी खोदाखोद केली तर काही बिया सापडतील. एक हजार वर्षांपूर्वी सुकलेल्या चीनमधल्या मांच्युरियाच्या तळ्याच्या तळाशी बिया सापडल्या, त्यातल्या काही रुजल्या. त्या कमालिनीच्या कळ्या धरल्या. त्या फुलल्या. सोळा पाकळ्यांची ती कमळे होती. जपानमध्ये टोकियोत एका इमारतीचा खोल पाया खणताना तीन हजार वर्षांपूर्वीच्या कमळांच्या बिया मिळाल्या, याच काळच्या कमळाच्या बिया पिरॅमिडातही मिळाल्या. मग सिद्धेश्वराच्या तळ्यात बुडी मारलेले मकाणे रुजून खचित मेले नसतील. कुणी त्यांना वर काढून त्या सोनदळी कमळांच्या वेलींना पुनर्जीवन देईल का?'

'तुळस' तुळशीच्या झाडाचे सौन्दर्य, त्या झाडाच्या लहानखुऱ्या रूपाबद्धल भारतीयांची जडलेली सात्विक, वत्सल भावना, सगळ्या पारंपरिक गोष्टीत तिचा होणारा उपयोग, तिचे महत्व, तिच्यावर रचलेल्या पौराणिक कथा, करुणरसाने भरलेल्या लोककथा, लोकगीते याबद्धल या लेखात लिहिले आहे. तुळस हि कुमारिकेचे प्रतीक आहे, तरीही पुराणातील नियमानुसार लग्न तिलाही चुकले नाही. तुळशीचे लग्न आणि त्यावरील कथा फारच रंजक आहेत. खुद्द दुर्गा भागवतांनी 'तुळशीचे लग्न' नावाचे एक छोटे पुस्तक लिहिले आहे ज्यात तुळशीची आणि तिच्या लग्नाची कथा आहे. या लेखात पुराणातल्या तुळशीशी निगडित अनेक कथा, संदर्भाचा परामर्श त्या घेतात.

'वनकथा' या लेखात दुर्गाबाई आपल्या मध्यप्रदेशातील भ्रमंतीतील आणि महानदीच्या तीराच्या आसपासच्या भागातील आदिवासींच्या आठवणी आणि अनुभव सांगतात. आदिवासींचे वागणे, बोलणे, त्यांच्या समजुती इत्यादिविषयी त्या लिहितात.

'रानझाडांची गोष्ट' या लेखात त्यांनी जातककथांतील एक कथा सांगितली आहे. जातककथा या गौतम बुद्धाच्या पूर्व जन्माच्या (या कथांत त्याला बोधिसत्व म्हटले जाते). शाल म्हणजेच सागाच्या झाडाशी निगडित हि कथा आहे.

'झाडांचे आक्रंदन' या अतिशय सुंदर लेखात त्यांनी झाडेही बोलतात, त्यांनाही भावना व्यक्त करता येतात, स्वतःच्या दुःखाचे आक्रंदनही करता येते त्याबद्धल कळकी, केळी यांचे काही पुरावे दिले आहेत. अँथोनी जुलिअन हक्सले या अत्यंत गुणी आणि रसिक शास्त्रज्ञाने 'प्लांट अँड दि प्लॅनेट' नावाच्या पुस्तकात कळकीच्या कोंब फुटताना होणाऱ्या आक्रन्दनाविषयी लिहिले आहे. कळकीचा कोंब म्हणे सात पदर तोडून बाहेर येतो. याविषयीच्या अनेक आख्यायिकाही आहेत. तसेच पाऊस येणार म्हणून नाचलेल्या एका झाडाविषयी एक शास्त्रज्ञांनी सांगितलेली गोष्टही त्या सांगतात.

'खडपा उसाची आठवण' या लेखात त्यांनी लहानपणीची एक रुद्द्य आठवण सांगितली आहे. त्या तेव्हा नाशिकमध्ये आत्याकडे राहत होत्या आणि गावातील बंधनांना जुगारून मोकळेपणे, मस्ती करत त्या जगत होत्या. लोक काय म्हणतील याची भीड त्यांनी बाळगली नाही. परंतु लोक बेरकी होते, त्यातीलच एक म्हणजे दुर्गाबाईंच्या मैत्रिणीच्या घरांतल्यानीच एकदा दुर्गाबाई आणि त्यांच्या बहिणीला बोलावून त्यांचा अपमान करण्याचे ठरवले आणि त्यांना कुणीही न खाऊ शकणारा खडपा ऊस खाऊ घातला. त्या लोकांना मात्र दुर्गाबाई पुरून उरल्या आणि त्यांची चांगली खोड कशी मोडली त्याबद्धल हा लेख आहे.

'गेंडा' , 'हत्तीची कथा' या लेखांत या प्राण्यांविषयी अनेक संदर्भ, त्याच्या विषयीची अतिशय छान माहिती त्यांनी दिली आहे.


'पक्ष्यांचे बोल' हा अतिशय सुंदर लेख आहे, कवडा, पावश्या , पोपट, कबुतर, भुंगा , चिमणी  यांच्या बोलांविषयी त्यांनी लिहिले आहे, त्यांच्या बोलांवरून पडलेल्या लोककथा आणि आख्यायिकांचे संदर्भही दिले आहेत. तसेच 'पिवळीच मी पाकोळी की' या लेखातही त्या पाकोळीविषयी, आणि 'वेडे झाड' या लेखात एकही पान सारखे नसलेल्या एका झाडाविषयी त्यांनी लिहिले आहे.

अतिशय सुंदर माहिती, आणि अवलोकन असलेला हा निसर्गाच्या अनंत लीलांच्या संदर्भांनी नटलेल्या  लेखांचा असा हा वाचनीय 'निसर्गोत्सव' आहे.

Monday 9 January 2017

गोष्टींची गोष्ट

[या पुस्तकावरचे सुंदर चित्र हे  राथवा आदिवासी जमात, गुजरात यांच्या लोककलेतील भित्तिचित्र आहे. निर्मितीसंबधी च्या 'मिथ'वर ते आधारलेले आहे.  ]
आपल्या लहानपणी 'गोष्ट सांग' असे आपण कितीतरी वेळा ऐकले, विनवले असेल. गोष्टी न आवडणारा माणूस विरळा. आमच्या लहानपणी टि.व्ही वर कार्टून्स येत नसत. घराच्या जवळ असलेल्या कोपऱ्यावर एक 'रामेश्वर' नावाचे दुकान होते. काही बिनसले, किंवा परीक्षा संपून सुट्टी पडली, किंवा वाढदिवस असे काही कारण मी काढले कि माझे आजोबा/बाबा/आई यापैकी कुणीतरी मला रामेश्वर मध्ये घेऊन येत. गोष्टीची पुस्तकं दाखवा असे सांगितले कि दुकानातला ओळखीचा माणूस गोष्टीच्या पुस्तकांचा गठ्ठा काढून माझ्यासमोर ठेवी. सगळी २५-५० पैश्याची पुस्तके. ३०-३५ पानांची. पण ती बघून त्यातले हवे ते निवडायला काय मजा येत असे. 'जादूची पेटी', 'राजपुत्र आणि नीळा कोल्हा', 'दिपू आणि जलपरी, टिल्लू टॉम' अश्या नावांची.  २-३ पुस्तके घेऊन समाधाने घरी परतत असू. मग तहान भूक विसरून पुस्तकांचे वाचन. वय जसे वाढत गेले तसे थोड्या मोठ्या गोष्टींची पुस्तके वाचनात येऊ लागली, 'कपटी कंदार', 'भूतळी जहाज', 'फास्टर फेणे', 'वेताळ पंचविशी'. वेताळ आणि मेंड्रेक ची कॉमिक्स तर ऑल टाइम फेवरेट. अश्या या गोष्टींनी पाठ कधी सोडलीच नाही. नंतरच्या काळात टि .व्ही. वरच्या 'पंचतंत्र', 'अलिफ लैला','अमरावती कि कथांये' 'चंद्रकांता' अश्या मालिकांत गोष्टी भेटतच राहिल्या. या गोष्टी मनाला गुंगवतात आणि गुंतवतात. त्यामुळेच गोष्टींची मानवी मनाला कायमची भुरळ पडली आहे. जगभर गोष्टी रचल्या गेल्यात आणि सांगितल्या गेल्यात. माणसाकडे कल्पनेची कमी नाही आणि मनोरंजन तर मनाला हवेच त्यामुळेच प्राचीन काळापासून गोष्टी रचणे सांगणे चालत आले आहे. बऱ्याच ठिकाणी या गोष्टी बोलण्याबोलण्यातून तयार होतात आणि तोंडी सांगत सांगत एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात पसरत जातात. तिथे पोचल्या कि तिथली राहणी, तिथली भाषा लेऊन त्यांना नवीन रुपडं मिळतं. या कथांचा उद्देशही निरनिराळा. कधी मनोरंजन, कधी बोध, शिकवणूक, कधी कुठल्या संताचे सांगणे पटवून देण्यासाठी, इ. इ.
बुद्धावर लिहिलेल्या जातककथा जितक्या बोधपर तितक्याच मनोरंजकही आहेत. 'अरेबियन नाईट्स'(हा मुळ ग्रंथ वाचायचा राहून गेलाय) पण त्यातल्या कथाही खूपच मनोरंजक आहेत ज्यांचे रुपांतर टि.व्ही वर केले गेले. 
किती लेखकांनी आणि स्कॉलर्सनी या कथांचा पाठपुरावा केलाय. मानववंशशास्त्रज्ञ तर या कथांचा बारकाईने अभ्यास करतात कारण त्यातून लोकांची जीवनशैली कळते, बोलीभाषेतील बारकावे, अपभ्रंश, नवीन तयार झालेले शब्द कळतात. रितीरिवाजही कळतात. आजपर्यंत किती लोकांनी या गोष्टींचा मेहनतपूर्ण अभ्यास आणि शोध केला आहे, परभाषीय कथा मुद्दाम भाषांतरित करून अभ्यासल्या आहेत. दुर्गा  भागवत, रिचर्ड बर्टन, ए. के. रामानुजन अश्या अनेक विद्वान लोकांनी यांवर काम केले आहे. रिचर्ड बर्टनने अरेबियन नाईट्सचे मूळ अरेबिक मधून इंग्रजीत भाषांतर केले, दुर्गा  भागवत यांनी जातक कथांचे सात खंड मूळ पाली भाषेतून मराठीत आणले. ए. के. रामानुजन यांनी ठिकठीकाणहून लोककथा गोळा करून त्यांचे संकलन केले.
हल्लीच त्यांचे 'Folktales From India'  हे पुस्तक वाचनात आले.
यात २२ भाषांमधल्या शंभराहून अधिक गोष्टी संकलित केलेल्या आहेत. ए. के. रामानुजन यांनी प्रस्थावनेत म्हटलं आहे 'It (The Book) is called Folktales FROM India, not OF India, for no selection can truly 'represent' the multiple and changing lives of Indian tales. Instead it 'presents' the multiple and changing lives of Indian tales.

त्यांनी या गोष्टींबद्धल माहितीही दिली आहे. वेगवेगळ्या धर्मांत, प्रांतांत सांस्कृतिक देवाणघेवाण हि कायम होतच असते. आणि ह्या द्वारे म्हणी, सुविचार, विनोदी चुटके, गोष्टी, घरगुती उपचार, कोडी, पाककृती हे सर्व Autotelic (They travel by themselves without (often) any movement of the population) रीतीने स्थलांतरित होत असतात. भारतातील भाषांमधे बरेच लोककथांचे विषय, वस्तू सारख्या आहेत. आणि तरीही यांचा उपयोग आणि त्यांचा कथेतील अर्थ भिन्न असू शकतो. स्थळकाळाप्रमाणे या गोष्टी बदलत जातात. याबाबत एक छान उदाहरण रामानुजन यांनी दिले आहे. एकदा ऍरीस्टॉटल ने एका गावातल्या सुताराला त्याची सुबक सुरी बघून विचारलं कि किती वर्षांपासून हि सुरी तुझ्याकडे आहे, त्यावर तो उत्तरला कि पिढ्यांपिढ्या ती आमच्याजवळ आहे फक्त आम्ही फक्त तिचं पातं आणि मुठ अनेकवेळा बदलंय. तश्याच या गोष्टी आहेत, पिढ्यांपिढ्या बदलत जाणाऱ्या, गोष्ट जरी तीच तरी तिचे रूप बदलून जातच असते आणि त्यातले विषय, वस्तू त्या त्या काळाच्या रीतीरिवाजानुसार  वेगवेगळी रुपं धारण करतात. या गोष्टी पसरतात कशा? तर बहुतेक घरच्या घरी सांगितल्या जातात, काही लोककला सादर करणाऱ्या कलाकारांकडून सादर होतात.
रामानुजन आपल्या स्वतःच्या घरचा अनुभव सांगतात. त्यांच्या घरी एकत्र कुटुंब होतं आणि 'बेडटाईम स्टोरी' ऐवजी 'मीलटाईम स्टोरी' असायची. घरातल्या सर्व मुलांना एकत्र बसवून एका मोठ्या ताटात जेवण कालवून घास-घास एकेका मुलाला भरवला जाई. हे काम आजी किवा काकी करत असत. भरवताना गोष्ट सांगण्यामागे हाच उद्देश असे कि मुलांना (गोष्ट ऐकण्यात दंग झाल्याने) जेवणाविषयी कुरकुर करता येऊ नये आणि त्यांच्या कडून भरपूर अन्न खाल्ले जावे. घरात काम करणारे गडी सुद्धा ज्या गोष्टी सांगत त्यातून त्यांच्या जमातींच्या गोष्टी कळत. जो गोष्ट सांगणारा असतो त्याच्यावर सुद्धा गोष्ट सांगणं अवलंबून असतं. जसं आजी, काकी हे स्वयंपाकघराच्या आजूबाजूच्या किवा घर, घरतील माणसे यांवर आधारलेल्या गोष्टी सांगतात. तर आजोबा, काका हे घराबाहेरच्या गोष्टी सांगतात.

या पुस्तकात संकलित केलेल्या गोष्टी 'पंचतंत्र', 'कथासरितासागर' मधल्या नाहीत. काही बंगाली गोष्टी रामकृष्ण परमहंस यांनी सांगितलेल्या आहेत. त्या रामानुजन यांनी मुद्दाम उल्लेख करून इथे दिल्या आहेत. रामकृष्ण परमहंस स्वतः लिहू-वाचू शकत नसत पण त्यांच्याकडे अश्या लोककथारूप  गोष्टींचे भांडार होते.

या गोष्टी किती जुन्या आहेत? तर याचे उदाहरण देताना रामानुजन सांगतात 'माकड आणि मगर' (माकडाचं हृदय मगराची बायको मागते ती गोष्ट) हि गोष्ट जेव्हा त्यांनी त्यांच्या archeologist मित्राला सांगितली तेव्हा त्याने सांगितले कि हि गोष्ट मंटाई, श्रीलंका येथल्या उत्खननात सापडलेल्या भांड्याच्या तुकड्यावर चित्ररूपाने चितारलेली होती. या गोष्टीचे दुसरे रूप बौद्ध संप्रदायामध्येही आढळते. पाचव्या शतकातील पंचतंत्रातहि हि गोष्ट सापडते. ११ व्या शतकातील कथासारितासागरात अरेबियन नाईट्सच्या आणी शेक्सपियरच्याहि काही गोष्टी आढळतात. (All's well that ends well, Cymbeline). अश्याप्रकारे गोष्ट किती जुनी आहे आणि तिचा उगम कसा आणि कुठे झाला हे सांगणे म्हणजे पुरातत्वशास्त्रासारखाच अभ्यास करावा लागेल.


या गोष्टींचे स्वरूप काय असते? तर काही महत्वाचे थीम्स या गोष्टींमध्ये आढळतात.
१) स्त्री-प्रधान गोष्ट : यात स्त्री मुख्य पात्रं असते. तीच्यावर अन्याय करणारी कुणीतरी पात्रं असतात (बहुदा सासू, नवरा , चोर असे) त्यातून ती कसा मार्ग काढते, चातुर्यवान, धैर्यशाली कशी असते अश्या स्वरूपाची गोष्ट  असते. स्त्री च्या  गोष्टीतील समस्या घरगुती जाच, पतीकडून अस्वीकार, कुटुंबाला वाचवणे अश्या असतात. 
२) पुरुष-प्रधान गोष्ट: यात अनेक विषय, नीती, नियम, त्यांचे पालन, राजा आणि त्याचे सहायक, लढाई, राजकारण
३) घराबद्धलच्या/कुटुंबाबद्धलच्या गोष्टी: कौटुंबिक समस्या
नियती, मृत्यू, देव, राक्षस, भुतंखेतं, विदुषक( तेनाली रामा), चतुर माणसं(बिरबल, गोपाल भर) यांच्या गोष्टी: यात खूप विविधता असते.
४) प्राण्यांच्या गोष्टी  
५) गोष्टींबद्धलच्या गोष्टी

या गोष्टींचे प्रयोजन काय? तर मनोरंजन,बोध आहेच पण या कथांतून रिती,परंपराही  जपल्या जातात. पिढ्या, जाती, पंथ, धर्म, प्रांत यांची बंधने तोडून चांगले आहे ते घेऊन संवादहि साधला जातो. लोककथा त्या त्या भागाची मानसिकताही समजण्यास मदत करतात.
यातली सर्वात मनोरंजक आहे ती गोष्टींबद्धलची गोष्ट. या गोष्टींमध्ये गोष्टीबद्धल निवेदकाला काय वाटते तेही कळते. अशी एक गोष्ट आहे
Tell It to the Walls (भिंतींना सांगा) ह्या तामिळ गोष्टीत एका म्हतारीला आपली गोष्ट कुणालातरी सांगायची असते. म्हातारी घरच्या सुनां-मुलांच्या त्रासाबद्धल कुणाकडे बोलू शकत नाही, सगळ्या गोष्टी आपल्या आताच ठेवल्याने ती जाड व्हायला लागते. मुले-सुना मग आणखी चेष्टा करू लागतात. तेव्हा एक दिवस घरात कुणी नसताना ती घराबाहेर पडते. एका पडक्या घरात जाते. त्यांच्या प्रत्येक भिंतींना आपली कर्मकहाणी सांगते. तेव्हा एक एक भिंत कोसळून पडते आणि म्हातारीही बारीक बारीक होत जाते.

'न्हाव्याचे गुपित' या कथेतही राजाच्या गाढवासारख्या कानांची गोष्ट तो कुणाला सांगू शकत नाही , शेवटी ती तो एका झाडाला सांगतो. काही गोष्टींना स्वतःचे अस्तित्वदेखील आहे आणि त्यांना इच्छादेखील आहेत कि आपल्याला कुणाकडून सांगितले जावे. अशी एक गोष्ट आहे  'न सांगितलेल्या गोष्टी' जिच्यात गोष्टी एका 'गोंड' माणसाच्या पोटात असतात आणि आपल्याला सांगितले जावे म्हणून विनवणी करतात, तो  नकार देतो तेव्हा त्या बंदिस्त झाल्यामुळे रागावतात आणि पुढचे कथानक घडते. यातून काय सांगायचे आहे? तर हेच कि जर तुम्हाला एखादी गोष्ट माहित आहे तर ती स्वतःकडे बंधिस्त न ठेवता सांगितली पाहिजे.
'प्रेक्षकांच्या शोधतली गोष्ट' या कथेत निवेदक गोष्ट सांगण्यासाठी सगळीकडे फिरते, पण कुणाला गोष्ट ऐकायला वेळ नसतो. शेवटी ती गोष्ट पोटातील एक गर्भ ऐकतो.
'जेव्हा तुम्ही खरंच ऐकता तेव्हा काय होते' या कथेत 'रामायणाच्या गोष्टी' ऐकल्याने एका असंस्कृत माणसात काय फरक पडला हे दाखवून दिले आहे.


रामानुजन यांनी ३ हजार गोष्टींमधुन शंभरएक गोष्टी निवडून या पुस्तकात संकलित केल्या आहेत.हे पुस्तक ज्यांना गोष्टी वाचायला आवडतात त्यांना खूपच आनंद देऊन जाईल.
मला यातल्या काही गोष्टी खुप आवडल्या. उदाहरणार्थ
The Jasmine Prince (जास्मिन राजपुत्र) :हि तामिळ गोष्ट आहे. यात एक राजपुत्र असतो जो जेव्हा हसत असे
तेव्हा त्याच्या हास्याला मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध येत असे. याचे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी एकदा दुसऱ्या एका राजाने त्याला आपल्या दरबारात बोलावले आणि हसण्यास सांगितले. पण तो मुद्दाम कसं हसणार? त्याने सांगितले मी असं खोटं खोटं हसू शकत नाही, जेव्हा मला खरच हसू येईल तेव्हाच माझे हास्य मोगऱ्याच्या वासाने सुगंधित होईल. राजाला वाटले  कि हा खोटेच सांगतो आहे याच्या हास्याला काही सुगंध-बिगंध नाही. राजाने रागावून राजपुत्राला कोठडीत डांबले. त्या राजाच्या राणीचे एका पांगळ्याशी सूत जुळलेले असते, रात्रीच्या वेळी ती त्याला भेटायला जाई. आणि ती जिथे त्याला भेटायला जाई ते ठिकाण जास्मिन राजपुत्राच्या कोठडीजवळ होते. एकदा जेव्हा तिला उशीर झाला तेव्हा पांगळ्याने रागावून तिला भरपूर मार दिला. तरी ती त्याला आणलेली पक्वान्ने खाऊ घालू लागली, त्यामुळे पश्चात्ताप होवून त्या पांगळ्याने तिला विचारले कि तूला मी एवढं मारलं तरी तुला राग का आला नाही. त्यावर ती म्हणाली कि मला तर तुम्ही मला मारलत ते अतिशय आवडलं. मला १४ लोक (तिन्ही लोक ) बघितल्याचं समाधान मिळालं. त्यांचं संभाषण बाजूच्या व्हरांड्यातला एक धोबी ऐकत होता. त्याचं एक गाढव हरवलं होतं. ते राणीचे उद्गार ऐकून तो मोठ्याने म्हणाला 'हिला १४ लोक(तिन्ही लोक) दिसले आहेत तर हिला माझं गाढव नक्कीच दिसलं असणार. हे ऐकून जास्मिन राजपुत्र हसायला लागला आणि मोगऱ्याचा सुगंध सगळीकडे पसरला. राजालाही जेव्हा हे कळले तेव्हा त्याने जास्मिन राजपुत्राला कोठडीतून मुक्त केले आणि आता त्याच्या हास्याबद्धल विचारले, राजपुत्राने जेव्हा खरी हकीगत सांगितली तेव्हा त्याने जास्मिन राजपुत्राला मुक्त करून भेटींसहित त्याच्या प्रांताकडे  रवाना केले आणि राणीला शिक्षा केली.

तेनाली रामा (विकटकवी)विदुषक कसा झाला?
तेनाली रामा हा विजयनगर च्या कृष्णदेवराय या राजाच्या दरबारात विकटकवी(विदुषक) म्हणून होता. त्याआधी तो विकटकवी बनला कसा ते ह्या गोष्टीत सांगितले आहे.
एकदा तेनाली राम लहान असताना काली मंदिरात जातो आणि देवीला सांगतो कि तू मला दर्शन दे. देवी समोर येते, तिचे अनेक तोंडांचे रूप पाहून तो घाबरण्याऐवजी हसायला लागतो. ती हसण्याचे कारण विचारते तेव्हा तो निर्भयपने उत्तर देतो. देवी रागावते पण नंतर त्यांचे धैर्य बघून प्रसन्न होते आणि म्हणते कि तू विकटकवी होशील. (विकटकवी हा palindrome आहे. वि-क-ट-क-वि ) पण प्रसन्न झाल्याने असेही म्हणते कि तू राजदरबारातला विकटकवी होशील.

आणखी अश्याच खूप गोष्टी या पुस्तकात आहेत, त्यासाठी पुस्तक मूळातून वाचायला पाहिजे.

Friday 6 January 2017

मॅन्स सर्च फॉर मीनिंग - व्हिक्टर फ्रेन्केल


'मॅन्स सर्च फॉर मीनिंग' हे व्हिक्टर फ्रेन्केल यांचे पुस्तक वाचून काय वाटले ते सांगायला अजून बराच काळ जावा लागेल.  व्हिक्टर फ्रेन्केल हे युरोपातील दोन्ही महायुद्धांच्या काळात एका ज्यू कुटुंबात जन्मलेले.
वर्ल्ड वॉर, हॉलोकॉस्ट या विषयांवर आजवर अनेक पुस्तके लिहिली गेलीत. ती सर्वच अतिशय सुन्न करणारी असतीलच (मी काही ती वाचली नाहीत). या भयानक वातावरणाचे साक्षीदार आणि त्यांच्या तोंडून त्यांच्या अनुभवांचं कथन वाचणं हा भयंकर त्रस्त करणारा प्रकार आहे म्हणून मी फारसं  त्याच्या वाट्याला कधी गेले नाही. पण एका सायकॉलॉजी संबंधित लेखामध्ये मी व्हिक्टर फ्रेन्केल यांच्याबद्धल आणि त्यांच्या लेखानाबद्धल वाचलं. ते स्वतः मानसोपचार तज्ञ होते आणि १९४२ पासून ते १९४५ चा काळ  त्यांना नाझी कॉनसंट्रेशन कॅम्पमध्ये (ऑशविट्झ) घालवावा लागला. त्यानी तिथे आलेल्या अनुभवांचे चित्रण त्यात केले आहे. पण हे नुस्तं प्रसंगानुरूप अनुभवांचं चित्रण नाही, त्यानी इतक्या अलिप्तपणे (ऑब्जेक्टीव्हली) हे वर्णन केले आहे कि आपणाला ते अतिशय दाहक असूनही त्याची झळ बसत नाही. जीवनाच्या कठोरतेचे, भयाणतेचे प्रत्ययकारी विश्लेषण आपल्यासमोर ते मांडतात. आणि त्यांच्या लेखनात विदारकता नसून एक विलक्षण सकारात्मकता जाणवत राहते.

पहिल्या भागात ते आपल्या ऑशविट्झ कॉनसंट्रेशन कॅम्पमधील अनुभवांचे विश्लेषण करतात. दुसरया भागात त्यानी आपल्या 'लोगोथेरपी' या मनोविश्लेषणात्मक सिद्धांताबद्धल लिहिले आहे.

 कॉनसंट्रेशन कॅम्पमधले अनुभव अतिशय विलक्षण परिणामकारक आहेत. आणि त्यापेक्षाही त्यांनी त्या अनुभवांना एका तिऱ्हाईताच्या नजरेने बघून त्यांचे केलेले विश्लेषण विचार करायला लावणारे आहे. त्यांचे संपूर्ण कुटुंब (बायको, आई-वडील , भाऊ) या हॉलोकॉस्ट मध्ये वाचले नाहीत. डीपोर्टेशन दरम्यान त्यांना व त्यांच्या बायकोला त्यांच्या इतर कुटुंबापासून वेगळे करून ऑशविट्झ येथे नेण्यात आले. तिथे ते आल्या नंतरच्या प्रसंगांचं जे वर्णन करतात ते सामान्य माणसांच्या आणि त्याच्या सामन्यात सामान्य असणारया विवंचना यांच्या पलीकडचे आहे. आपला मेंदू क्षणभर विचार करणेच बंद करेल इतके ते धक्कादायक आहे. 
त्यांना स्वतःलाही  तो धक्का बसला होता.

कॅम्पमधील जीवनादरम्यानच्या तिथल्या रहिवाश्यांच्या मानसिकतेचे मानसशास्त्रीय अनुषंगाने त्यांनी तीन भाग केले आहेत. एक: कैद्याच्या जीवनातील तिथला सर्वात सुरवातीचा काळ , तो जेव्हा कॅम्प मध्ये दाखल होतो तेव्हा त्याच्यावर काय गुदरते. त्याची कशी अवस्था होते.   दोन: मध्यकाळ , त्याचा सर्व स्वीकारून(किंवा काहिंच्या बाबतीत सर्व नाकारून) तिथला जगण्याचा काळ   तीन : त्याची (जर तो शेवटपर्यंत टिकला असेल तर ) सुटका आणि त्यानंतरचा काळ.
एक: कैद्याच्या जीवनातील तिथला सर्वात सुरवातीचा काळ
फ्रेन्केल यांच्या अनुभव कथनाचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते त्या अनुभवाचे अनेक डायमेन्शन्स मध्ये (प्रतलामध्ये) चित्रण करतात. त्यानी हे पुस्तक का लिहिले तेही प्रस्तावनेत सांगितले आहे. त्यांना वाचकांना या पुस्तकातून सांगायचे होते कि जीवनाच्या कुठच्याही स्थितीमध्ये(अत्यंत प्रतिकूल परिस्थतीत  सुद्धा) जीवनाला 'अर्थ' आहे. आणि याचे उदाहरण म्हणून कॅम्प मधल्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीबद्धलच्या अनुभवांचा आधार त्यांनी घेतला आहे.  पुस्तकाला अमाप यश मिळाले त्याचे त्यांना काहीही वाटत नाही, उलट वैषम्य वाटते कि ज्याअर्थी हे पुस्तक इतक्या वेगाने वाचायला उचलले जात आहे त्यावरून या वाचणाऱ्या लोकांचे आयुष्य त्यांना  किती अर्थहीन वाटत असेल. लोकं यश आणि आनंद याच्या मागे धावत असतात, त्यासाठी उद्धेश बाळगतात, ध्येय रचतात. पण जेव्हा आनंद, यश हे अंतिम लक्ष्य (ध्येय, उद्देश) मानले जाते, त्याचा पाठपुरावा केला जातो तेव्हा ते साध्य होत नाही. जितके आपण त्याच्या मागे लागू तितके ते आपल्यापासून दूर पळत राहील. आनंद, यश हे अंतिम ध्येय नव्हेत तर जगण्याच्या क्रियेतील बाय-प्रोडक्ट आहेत. ते मिळवता येत नाहीत तर ते आपसूकच घडले पाहिजेत.
 जर आपल्याला आपले रोजचे आयुष्यच कष्टमय आणि बऱ्याचदा 'अर्थहीन' वाटते तर या कॅम्प मधल्या विदारक जीवनाच्या 'अर्थहीनतेचा' आपण विचारच करू शकत नाही. त्या 'अर्थहीन' वाटणाऱ्या  जीवनातूनही  'अर्थ' कसा शोधला जाऊ शकतो हे फ्रेन्केल दाखवतात.

जेव्हा कैदी पहिल्यांदा कॅम्प मध्ये येतो तेव्हा तो 'शॉक' मधेच असतो. राहतं घर, व्यवसाय, कुटुंब, सगळं मागे सोडून तो तिथे येतो (कश्यासाठी? बहुदा 'मृतं मरण' मरण्यासाठी, किंवा 'जिवंत मरण' जगण्यासाठी). फ्रेन्केल सांगतात कि जेव्हा ती कैद्यांची ट्रेन शेवटच्या स्टेशनवर थांबली तेव्हा 'ऑशविट्झ' हे नाव वाचून सर्वांच्या पायातील शक्ती निघून गेली. पुढे काय वाढून ठेवलेय याचा कुणालाही पत्ता नव्हता. त्यातही आल्या आल्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांना 'निवड' प्रकियेला सामोरे जावे लागले. शेवटी निसर्गात जी निवड प्रकिया चालते (बेस्ट फिट) तीच, (पण निसर्ग मानवासारखा 'अनफेअर' नाही). आपण कुठे जाणार , ज्यांची (त्यापैकी काही मित्र, सखे सोबतीही होते) आपल्या गटात निवड झाली नाही ते कुठे गेले त्यांचे काय झाले काही ठाऊक नाही. अश्या परिथितीत त्यांना स्वतःबरोबर आणलेले जे काही थोडेसे सामान (शेवटपर्यंत जपलेले) सोडून द्यावे लागले, फ्रेन्केलना आपल्या आयुष्यभराच्या मेहनतीचे चीज: त्यांच्या अभ्यासपूर्ण संशोधनाचे लिहिलेले पुस्तकाचे हस्तलिखित गमवावे लागले. इतकेच काय तर कपडेही.  म्हणजे एका पारड्यात आजवर ज्यासाठी जगलो, झटलो ते, इच्छा, स्वप्नं, मिळवलेले सर्वकाही, जोडलेली नाती, जीवनाचे संचित. तर दुसऱ्या पारड्यात फक्त नागडं अस्तित्व.

जी. ए. म्हणतात त्याप्रमाणे  अजस्त्र जीवनरूपी श्वापदाने आपला कुठलातरी विलक्षण डोळा आपल्यावर रोखल्यासारखं हे जीवनाचं दर्शन. आतापर्यंत बाळगलेल्या सर्व शाश्वत मूल्यांची धूळधाण  करणारं, जीवनाविषयीच्या समज, समजुतीना ढवळून टाकणारं, सत्सदविवेकबुद्धीची प्रचंड उलथापालथ करणारं.

अनेक निवड प्रक्रियेनंतर जेव्हा त्यांना आंघोळीसाठी नेण्यात आलं तेव्हा शॉवर मधून खरोखरीच पाणीच पडताना बघून त्या परस्थितितलं जीवनाचं रौद्र, कारुण्य, बिभत्स असे सगळे भाव एकवटलेले ते रूप बघून ते असह्य झाल्याने लोकं त्याही प्रसंगात हसू लागली एकमेकांची चेष्टा करू लागली. आत्तापर्यंत घडलेल्या आणि पुढे येऊ घातलेल्या अनाकलनीय, भयाकारी नाट्यापासून मिळालेल्या या उसंतीच्या आणि तरीही त्रस्त मनस्थितीत त्यांना 'ह्युमर' चा (विनोदाचा)प्रत्यय आला. 'ह्युमर' बरोबर एक वेगळी अनुभूती त्यांना आली ती कुतूहल वाटण्याची (क्युरीऑसीटी)  आणि ही 'कोल्ड क्युरीऑसीटी' होती.
त्याचबरोबर 'असंवेदनशीलता', भावनेचा अभाव, स्वार्थ, औदासिन्य (वन कुड नॉट केअर लेस) अश्या अनेक मानसिक स्थिती अनुभवला येत होत्या. या विषयींचे अनेक प्रसंग फ्रेन्केल यांनी दिले आहेत. जे त्यानी स्वतः बाबत किंवा इतरांबाबत अनुभवले.

 दोन: मध्यकाळ

लोक सगळ्याला कसे तोंड देत होते(किंवा बळी पडत होते) ते फ्रेन्केल  या भागात सांगतात. मानसिकता अत्यंत 'प्रिमीटीव्ह' (मुलभूत) स्वरुपाची झाली होती ज्यात फक्त त्या कैद्याच्या इच्छा, आकांशा त्याच्या स्वप्नातच 'स्पष्टपणे' दिसू शकत होत्या. फ्रेन्केल सांगतात, त्या खडतर काळात, खडतर शाररीक श्रम आणि अत्यल्प आहार (कुपोषण) यात फक्त दोन तीन तास झोपेचेच काय ते त्यांच्या जगण्याचा आधार असत. त्यातही झोपेत पडणारी स्वप्नं. त्याचे महत्व अनन्यसाधारण होते. काय स्वप्न बघत लोक? तर ब्रेड, केक, सिगरेट्स, गरम आंघोळ, उबदार कपडे हेच. या सुखद स्वप्नांतून भयंकर वस्तूस्थतीला सामोरे जाणे म्हणजे काय याची कल्पनाच करणे अशक्य. त्यांचे अतिशय हृदयद्रावक वर्णन फ्रेन्केल करतात.

I shall never forget how I was roused one night by the groans of a fellow prisoner who threw himself about in his sleep, obviously having a horrible nightmare. Since I had always been especially sorry for people who suffered from fearful dreams or deliria, I wanted to wake the poor man. Suddenly I drew back the hand which was ready to shake him, frightened at the thing I was about to do. At that moment I became intensely conscious of the fact that no dream, no matter how horrible, could be as bad as the reality of the camp which surrounded us, and to which I was about to recall him.

झोप आणि अन्नाचे कॅम्पच्या जीवनातील अनन्यसाधारण महत्व ते सांगतात.

How unavoidable were the thoughts about food and favorite dishes which forced themselves into consciousness of the prisoner, whenever he had a  moment to spare. Even the strongest of us, was longing for the time when he would have fairly good food again. not for the sake of good food, but for the sake of knowing that the sub-human existence which made us unable to think of anything other than food, would at last cease.
Those who have not gone through a similar experience can hardly conceive of the soul destroying mental conflict and clashes of willpower which a famished man experiences.

भरल्या पोटाचे कुठलेही चोचले तिथे शक्य नव्हते, याबद्धल ते लिहितात:

Undernourishment, besides being the cause of the general preoccupation with food, probably also explained the fact that the sexual urge was generally absent, as opposed to all other strictly male establishments, such as army barracks, there was little sexual perversion.

अत्यंत मजबूत मानसिकता असलेल्या लोकांचाही असा भावनिक तोल ढळत असे , लोकं हळूहळू फक्त आपल्या जिवंत राहण्यासाठी लागणाऱ्या  गोष्टींपूरताच कसा विचार करीत आणि त्या व्यतिरिक्त सर्व इतर घडणाऱ्या गोष्टींबद्धल कसे अलिप्त (देणेघेणे नसल्यासारखे) राहत तेही फ्रेन्केल सांगतात.

 Spirituality
कल्चरल हायबरनेशन जरी असले तरी स्पिरीट्युअल फ्रिडम (आध्यात्मिक उन्नती) ला वाव होता. फ्रेन्केल म्हणतात : Sensitive people who were used to a rich intellectual life may have suffered much pain but the damage to their inner selves were less. They were able to retreat from their terrible surroundings to a life of inner riches and spiritual freedom. Only in this way, one can explain the apparent paradox that some prisoners of less hardly makeup often seem to survive camp life better than did those of robust nature.

how Art and memories of beloved can save in traumatic situations
फ्रेन्केल आपल्या बायकोची प्रतिमा मनात जागवून त्यात मग्न होवून क्रूर वस्तुस्थिती विसरण्याचा प्रयत्न करीत. आणि त्यातून शांतता मिळणारऱ्या अनुभवाबाबत ते लिहितात:
I understood how a man who has nothing left in the world still may know bliss, be it only for a brief moment, in the contemplation of his beloved. In a position of utter desolation, when man not not express himself in a positive action, when his only achievement may consist in enduring his suffering, in such a position, Man can through loving contemplation of image he carries of his beloved achieve fulfillment.

'कला' कशी जगण्याचे बळ देऊ शकते त्याबद्धल ते लिहितात.
As the inner life of the prisoner tended to become more intense, he also experienced the beauty of art and nature as never before. If someone has seen our faces on journey from Auschwitz to Bavarian camp as we beheld the mountains of Salzberg, with their summits glowing in sunset, through a little barred windows of prison carriages. He would have never believed that those were the faces of men who had given up all hope of life and liberty.
एकदा सुर्यास्त पाहून एका कैद्याने म्हटले 'आयुष्य किती सुंदर आहे!'
कॅम्प च्या जीवनात कुठूनतरी येणारे व्हायोलीन चे संगीत, कुणाच्यातरी कविता यांनी तिथल्या जीवनाची  भयानकता थोडीफार सुसह्य केली होती.

Humor for Soul preservation
जगण्यासाठी 'हसणं', नाच-गाणं किती महत्वाचं आहे त्याचे उदाहरण फ्रेन्केल यांनी दिले आहे. शेवटच्या काळात (अर्थात तो शेवटचा काळ आहे हे कुणाला माहित नव्हते) मुख्य म्हणून नेमलेले काही कैदी
 गप्पा, गाणी, निरुपद्रवी चेष्टा मस्करी करण्यासाठी दिवसाच्या कठोर मेहनतीनंतर जमत. इतर कैदी अगदी अंगात त्राण नसले आणि पाय ओढत असले तरी ते बघायला जीवाची पराकाष्टा करीत, काहीवेळेला तर त्यांना त्यासाठी आपले अपुरे जेवणही सोडावे लागत असे. आता याला काय म्हणावं?


Value of human life and human dignity

फ्रेन्केल सांगतात कि शाररीक श्रमांपेक्षा मानसिक जखम अत्यंत असहनीय असत. त्याचा  प्रत्ययकारी अनुभव त्यानी सांगितला आहे. एकदा ते प्रतिकूल वातावरणात नेहमीचं खडतर शाररीक काम करीत होते, तेव्हा श्रम असह्य होवून ते थांबले, आपल्याला कुणी थांबलेलं बघून मारेल म्हणून त्यांनी आजूबाजूला पाहिले तर तेव्हाच नेमका गार्ड त्यांच्याकडे बघत होता. आता आपली धडगत नाही असे त्यांना वाटले पण त्या गार्डने काहीच न बोलता त्यांच्यावर फक्त लहानसा दगड भिरकावला तेव्हा त्यांना वाटले कि आपण माणूस नाही, हे गार्डस आपल्याला माणूस समजतच नाही, एखाद्या जनावराला हाकवावे त्या प्रमाणे आपल्याला वागणूक आहे.
काहीच चूक नसताना जेव्हा विनाकारण शिक्षा भोगावी लागते तेव्हा होणाऱ्या शाररिक यातनांपेक्षा मानसिक यातना अधिक असतात.
तिथल्या अनेक लोकांना (जे उपयोगाचे नव्हते अथवा आजाराला बळी पडले होते) त्यांना नष्ट केले जाई. कैद्यांना फक्त नंबर होता, नाव नव्हते. आणि गुरांपेक्षाही वाईट अवस्थेत त्यांना ठेवले जाई , जगण्याचा अधिकारच नव्हता. त्याबद्धल फ्रेन्केल लिहितात:

How very little value was placed on human life in camp. One literally became a number,deal or alive : that was unimportant. The 'LIFE' of that number was irreverent 


Need for personal space, Solitude
फ्रेन्केल म्हणतात 'कळपाचे जीवन' (गुरांचे असते तसे) हेच तिथल्या जीवनाचे स्वरूप. या कळपानेच वाचता येई . जेव्हा कुठेही नेण्यात येई तेव्हा कळपाच्या मध्यभागी गपचूप उभे राहून गार्ड पासून जीव वाचवता येई त्यामुळे सगळ्यांनाच ती मधली जागा हवी असे. पण कधी कधी हे असा कळपातील जीवन असह्य होई आणि आपल्या स्वतंत्र अस्तित्वासाठी जीव कासावीस होई.

या विलक्षण अनुभवातून जाताना, जीवन-मरणाच्या पुसट रेषेवर चालताना देखील फ्रेन्केल यांच्या मते जगण्यात अर्थ होता. मिनिट-मिनिटाला हताश करणाऱ्या अनेक अनुभवातून जाउन सुद्धा त्यानी जगण्याबद्धलची श्रद्धा गमावली नाही. उलट त्यांच्या जगण्याला एक नवं परिमाण मिळालं. ते Randomness (यादृच्छिकता) आणि नशीब यालाही मानतात. कितीही झाले तरी कधीही gas चेम्बर्स मध्ये रवानगी होवून आयुष्याचा शेवट होण्याची टांगती तलवार प्रत्येकाच्या मनावर होती. भविष्य पुसून टाकल्याप्रमाणे याला काही शेवट, अंत आहे कि नाही या बद्धलची विफलताही होती. पण या सर्वातही आयुष्य कुठल्याही क्षणी अर्थपूर्ण आहे असेच त्यांचे मत झाले कारण त्याचा वारंवार प्रत्यय त्यांना कॅम्प मधल्या खडतर जीवनात आला. ते म्हणतात :
Everything can be taken from a man but one thing; the last of the human freedoms — to choose one's attitude in any given set of circumstances, to choose one's own way.

मरणे देखील अर्थपूर्ण असू शकते, अत्यंत निरर्थक मरणात देखील आपण आपली dignity सांभाळू शकतो आणि शांतपणे त्याला सामोरे जाऊ शकतो याचे विलक्षण अनुभव त्यांनी सांगितले आहेत.  
एका स्त्री बद्धल ते लिहितात जीचे आयुष्य  लवकरच संपणार होते. तिने त्यांना सांगितले कि समोरचे झाड तिचे मित्र आहे आणि तिचा त्याच्याशी रोज संवाद चालतो. मरणाची कल्पना असून देखील ती त्याबद्धल त्रस्त नव्हती. जीवनाबद्धलची एक प्रकारची खोल समज तिला मिळाली होती.  शेवट क्रूर आहे, आपली सुटका नाही फक्त शाश्वत दुःखच आहे ज्याचा अंत , म्हणजे स्वतःचाच अंत असे ठाऊक असणारी (जरी फार थोडी असली तरी) माणसे होती जी आपला ब्रेड चा तुकडा दुसऱ्याला देत, रोग्यांना दिलासेचे शब्द देत. अश्या अनेक अनुभवातून फ्रेन्केल गेले.

असे अनेक अनुभव या पुस्तकातून मुळातून वाचण्यासारखे आहेत. फ्रेन्केल यांच्या शब्दात इतकं सगळं होवून कुठेही द्वेषाची भावना नाही. ते म्हणतात. फक्त दोनच वंश (रेसेस) आहेत :  सभ्य आणि असभ्य
त्यांनी काही उदाहरणे दिली आहेत ज्यात कळते कि जर्मन लोकांत अनेक चांगले होते आणि ज्यू लोकांत असे अनेक होते कि ते आपल्या समधर्मियांशी जर्मनांपेक्षा क्रूरतेने वागले.

एकदा एका वार्ताहर स्त्री ने फ्रेन्केल यांना प्रश्न विचारला होता कि 'तुम्ही जर्मन मध्ये पुस्तक का लिहिले, ती हिटलर ची भाषा आहे. ' त्यावर फ्रेन्केल म्हणाले : 'तुम्ही तुमच्या जेवणघरात चाकू/सूऱ्या कश्या काय वापरू शकता हे माहित असून सुद्धा कि त्याने कत्तल केली जाते?'

तीन : सुटका आणि त्यानंतरचा काळ.

हा काळ वाटावा तेवढा सुखी नव्हता उलट ज्यास्त त्रस्त करणारा होता, कारण कॅम्प मध्ये खडतर आयुष्यात कैद्यांकडे आशा होती कि आपण इथून सुटून आपल्या कुटुंबाकडे परत जाऊ शकू. काहींच्या बाबतीती ती शक्यता पूर्णपणे नाश पावली होती.
फ्रेन्केल लिहीतात :
"Freedom" we repeated to ourselves, and yet we could not grasp it.We had said this word so often that it had lost its meaning.
We had literally lost the ability to feel pleased and had to relearn it slowly.
depersonalize म्हणजे कुठल्याही बाबतीत वैयक्तिक रित्या काहीही न वाटणे. 'हे माझ्यासाठी नाही' ची भावना वाटणे. हा  हि त्या मुक्त झालेल्यांचा अनुभव होता. पण शरीर मनापेक्षा लवकर संकोच सोडते. जेव्हा फ्रेन्केल यांना खऱ्या अर्थाने फ्रिडम चा अनुभव आला तो पूर्ण भाग अतिशय वाचनीय आहे.
त्यांनी लोकांच्या स्वभावातील बदल इत्यादीबद्धल देखील लिहिले आहे. ते म्हणतात :
During this phase, people with natures of a more primitive kind could not escape the influences of brutality which had surrounded them in the camp life. Now being free, they thought , they could use their freedom "licentiously and ruthlessly". Oppressors instead of Oppressed, instigators,being unjust and justified their behavior by their own experiences.

पुस्तकाचा दुसरा भाग म्हणजे  फ्रेन्केल यांनी आपल्या अभ्यासावरून व आलेल्या थेट अनुभवातून बनवलेले तत्त्वज्ञान आहे. हि 'लोगोथेरपी' आजपर्यंत अनेकांना  निराशेच्या खोल गर्तेतून काढण्यासाठी, आत्महत्तेपासून परावृत्त करून जीवनावरचा विश्वास दृढ करण्यासाठी उपयोगी पडली आहे. त्याचे महत्वाचे अंग म्हणजे घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला (मग ती कितीही अर्थहीन वाटेल, कितीही hopeless वाटेल ) अर्थ आहे असे मानाणे, त्याचे साक्षीदार म्हणून स्वतः ला जबाबदार मानणे. तेव्हाच त्यातून 'अर्थ' हाती लागेल व त्यातून बाहेर पडण्याचे बळ येइल. 'लोगो' म्हणजे (ग्रीक ) "meaning", अर्थ. याबद्धल बरच विवेचन फ्रेन्केल यांनी अनेक उदाहरणांसह या भागात केलं आहे ते मुळातून वाचाण्यासारखं आहे. 


या पुस्तकातले अनुभव नुसते वाचून सुन्न होऊन, विसरून जाण्यासारखे नाहीत तर ते वेळोवेळी मनात धगधगत ठेवून आपण 'जीवनासाठी' काय करतोय असा विचार करायला लावणारे आहेत. फ्रेन्केलनीही त्यांच्या अनुभवांचं चित्रण करताना म्हटलं आहे कि वेळ अशी होती कि जीवना कडून आपल्या काय अपेक्षा आहेत, आपण काय अपेक्षा करू शकतो यापेक्षा महत्वाचं होतं कि जीवनाच्या 'आपल्याकडून' काय अपेक्षा आहेत?'
आपण नेहमी जीवनाकडेच मागत असतो. नाही मिळालं त्याबाबत रडत-भेकत असतो. कुढत असतो. पण कधी हा विचार केला आहे का कि जीवन आपल्याकडून काय मागतं?


जीवनाचा हा थेट अनुभव आणि त्यातून मिळू शकणारं ज्ञान. जे कुठलंही पुस्तक वाचून (हे आत्ताचं सुद्धा) मिळणार नाही. मग काय मिळतं या पुस्तकातून? हेच की या त्यांच्या अनुभवातून काही ज्ञान मिळणार जरी नसलं तरी स्वतःच्या जीवनातून( जे काही आपलं फुटकळ किंवा अवाढव्य, बरं किंवा वाईट, उत्साही किंवा कंटाळवाणं, सुंदर किवा भयंकर असं आपल्या जीवनाचं स्वरूप आहे) ते ज्ञान नक्कीच 'स्वतःचं  असं, स्वतःपुरतं मिळू शकतं. तो अर्थ आपणाला आपल्या 'कश्याही' परिस्थितीतल्या आयुष्यातून मिळू शकतो. इथे मला पु. लं. नी त्यांच्या जवळच्या एका व्यक्तीला लिहिलेल्या पत्रातील वाक्य पुसटसं आठवतं , 'जीवनाला अर्थ नसेल/ नसतो पण तो अर्थ आपण द्यायचा असतो'.  अर्थहीनतेतही 'अर्थ' मिळू शकतो.

जीवन आपल्याकडून हेच मागत असतं : आपल्याला कळलेला त्याचा अर्थ.

Wednesday 4 January 2017

'अनबिअरेबल लाईटनेस ऑफ बीइंग'



'अनबिअरेबल लाईटनेस ऑफ बीइंग' हे पुस्तक मी दोन दिवसात वाचलं. कारण ते लायब्ररीचं होतं आणि एक नेहमी 'इन सर्क्यूलेशन' असणारे पुस्तक 'अव्हेलेबल' झाल्याने मी हावरेपणाने चटकन त्या पुस्तकाची रिक्वेस्ट टाकली.
त्यामुळे दोन दिवसात मला युद्धपातळीवर हे पुस्तक वाचावं लागलं. खरं तर जर दोन दिवसांची डेडलाईन ठेवली नसती तर हे पुस्तक पूर्ण करणं जवळजवळ अशक्य होतं. पुस्तक छोटंसंच. तीनशे पानांचं. वाचत गेलं तर सलग वाचत जावं अशी शब्दांची ओघवती रचना. (Czech भाषेतून अनुवादित असलं तरीही) पण वाचून पदरात फारच कमी पडावं अशीच त्याची मांडणी आहे. हे पुस्तक वाचताना आपल्याला खूप काही कळतंय आणि एकदम काहीच कळत नाहीये अशी माझी स्थिती झाली. हे पुस्तक वाचता असताना, घरात, काहीतरी फालतू कारणावरून मनस्ताप देणारं भांडणही झालं. भांडण झालं कडाक्याचं, तरीही वरणभाताचं  गरमगरम  जेवण बनवून ते जेवून जीव शांतही केला. भांडण मिटलं. आणि पुस्तक सॅकमध्ये घालून समुद्रही गाठला. समुद्रावर जाताना जी 'ओला' बुक केली होती त्यातला ड्राइव्हर फक्त स्वतःसाठी गाडी चालवत होता आणि आमच्यावर गाडी चालवून कृपा करत होता. सूर्य बुडताना बघणे चुकू नये म्हणून लवकर निघालो तर हे महाशय गाडी 'सुशेगात' चालवत होते. बरोबरीला त्याच्या 'फुल डाउनलोड प्लॅन' असलेल्या 'हायएन्ड फोन' वरून 'युट्यूब' वर लावलेली टुकार, कधीही न ऐकलेली पंजाबी आणि कसल्या कसल्या अगम्य शब्दांची रॅप गाणी होती.
समुद्रावर पोहोचेपर्यंत सूर्य बुडून गेला होता. अंधार पसरत चालला होता. अंधार वाटच बघत होता बहुतेक. वाळू, लाटां, अंधारात भिरभिरणारी काळी छोटी पाखरं, लोकांची गर्दी, वाळूत धावणारे कुत्रे, लोकांचे हसण्या-खिदळण्याचे आवाज, दूरच्या बीचसाईड हॉटेलमधल्या पार्टीचे ढणढणत असलेले स्पीकर्स आणि अथांग पसरलेला समुद्र या सगळ्यात सॅकमधले 'अनबिअरेबल लाईटनेस ऑफ बीइंग' तसेच राहिले.

'क्षितीजापर्यंत जे पाणी दिसतंय ते किती खोल असेल?' , 'खूप खोल, इथून दहा पावलांवरच खोल आहे ते'. 

समुद्रावरून येतानाही भेटलेल्या रिक्षावाल्याने भन्नाट वेगात घरी परत आणून सोडले. 'अरे धीरे चलाओ' म्हटलं की 'अभी आपके स्पीडसेही चलाता हू' असे म्हणे, वेग कमी करे आणि पुन्हा थोड्या वेळाने तोच भन्नाट स्पीड.

'अनबिअरेबल लाईटनेस ऑफ बीइंग' मधील 'इटर्नल रिटर्न' , 'कॅरेनिन' , 'किश', 'चेकोस्लोव्हाकीया', 'कम्युनिझम', 'प्राग स्प्रिंग', 'बेथोव्हेन'  मात्र पुन्हा डोक्यातून वर आले घरी पोचताच, म्हणून ते पुस्तक उघडले वाचायला. ते दुसऱ्या दिवसापर्यंत वाचत राहिले अधून मधून. अस्वस्थता डोकावतच होती. शेवटी दुसऱ्या दिवशी, संध्याकाळ झाली, खोलीत काळोख पसरला तरी अंधुक होणाऱ्या ओळी वाचत राहिले.

या पुस्तकामधे गोष्ट अशी नाही. पण चार मुख्य पात्रांची आयुष्यं त्यात चितारली आहेत. ही आयुष्यं त्यांनी साठच्या दशकातील चेकोस्लोव्हाकिया, त्यातील प्राग शहर, काही गावं, स्वित्झरलँडमधील जिनिव्हा आणि झुरीक येथे घालवली आहेत. या पात्रांपैकी पहिला 'टॉमस' हा ब्रेन सर्जन आहे. तो प्राग मध्ये राहतो आणि अतिशय नामवंत डॉक्टर असतो. हा काळ, १९६८ मधील 'प्राग स्प्रिंग' या ऐहसिक घटनेचा, चेकोस्लोव्हाकिया मधील राजकारणाच्या आणि राज्यव्यवस्थेच्या एकंदरीत उलथापालथीचा. टॉमस हा 'राजकारण' या विषयांबाबत निर्विकारपणे स्वतःचे (individualistic) मत बाळगणारा असतो. म्हणजे ना तो अधिकारात असलेल्या व्यवस्थेच्या बाजूने असतो ना तो त्यांच्या विरुद्ध असलेल्या बंडखोर पक्षांच्या बाजूचा असतो. त्याचे वैयक्तिक आयुष्य त्याने 'नो स्ट्रिंग्स अटॅच्ड ' असेच ठेवलेले असते. पत्नीशी फारकत घेतल्यानंतर ती त्याच्या मुलाला भेटण्यावर बंधनं घालते तसेच लग्न न टिकवू शकल्याने त्याचे आईवडील त्याच्या पत्नीचीच बाजू घेतात आणि त्याला दोष देऊन त्याच्याशी बोलणे बंद करतात या सगळ्यामूळे कंटाळून तो आपल्या या सर्व नात्यांना रामराम ठोकतो आणि एक स्वच्छंद, (थोडेसे उतशृंखल) आयुष्य जगायला सुरवात करतो. अनेक स्त्रियांशी संबध ठेवतो पण कुणाशीही भावनिक जवळीक करत नाही. 'सबिना' ही अशीच त्याची एक चित्रकार  मैत्रीण. ती खास असते कारण तीही त्याच्यासारखीच 'नो स्ट्रिंग्स अटॅच्ड' जगणारी असते. परंतु जेव्हा टॉमसला 'तेरेझा' ही एक छोट्या गावातली, हॉस्पिटलच्या कँटीनमध्ये काम करणारी वेट्रेस भेटते तेव्हा मात्र तो तिच्याशी भावनिक रित्या गुंतत जातो. या त्याच्या मनातील भावनांचे सखोल चित्रण लेखकाने केले आहे. या आधी टॉमसने कधीही कुठल्याही स्त्रीला आपल्या घरी राहण्यापासून, आपल्या बिछान्यावर एकत्र निद्रा घेण्यापासून परावृत्त केलेले असते. त्याचे अनेक स्त्रियांशी संबंध असतात पण कुठल्याच स्त्रीला तो आपल्या घरी राहण्यास घेऊन येत नाही. त्याला तो बिछान्यात एकटा असेल तरच झोप येत असते, पण तेरझा त्याला भेटायला प्रागला येते, आणि अचानक आजारी पडते, तेव्हा हॉस्पिटलमध्ये तो तिची सेवा करतो. त्याला तेरेझाबद्धल काहीतरी वेगळे जाणवते. नंतर जेव्हा ती आपली 'जड बॅग' घेऊन त्याच्या घरी दाखल होते तेव्हाही तो तिला घरात राहण्यापासून परावृत्त करू शकत नाही. त्याला तेरेझा बद्धल वाटतं की हे एका बास्केट मधून नदीच्या प्रवाहात सोडलेलं एक अनाथ मूल आहे ज्याची सर्व प्रकारे काळजी घेतली पाहिजे. तेरझाची असुरक्षिता (Fragile,Vulnerability) त्याला तिच्याबद्धल खोल भावना उत्पन्न करायला मदत करते.

तेरेझा ही एका छोट्याशा गावात राहणारी आणि वेट्रेसचं काम करणारी मुलगी. तिच्या आईच्या विक्षिप्त, असभ्य वर्तनाने आणि तेरेझाशी सततच्या विचित्र वागणुकीमुळे तेरेझा आपल्या आईला कंटाळलेली असते. आईबरोबरचे वास्तव्य म्हणजे तिच्या मनातला 'कॉन्सन्ट्रेशन कॅम्प'च असतो. शेवटी टॉमस भेटल्यावर ती कायमची टॉमसकडे राहायला येते. तिचंही मन अतिशय गुंतागुंतीचं आहे. शरीर आणि सेक्ससंबधी घृणा, कमालीची अतिसंवेदनशिलता यामुळे तिला सतत दुःस्वप्ने पडत राहतात. तिच्याशी लग्न केल्यानंतरही टॉमसचे इतर स्त्रियांशी संबंध असतात. टॉमसचे बाहेरख्याली जगणं ती नाकारूही शकत नाही आणि स्वीकारूही शकत नाही.

सबिना ही चित्रकार. अत्यंत कडक नियम, बंधनं, पारंपरिक कल्पना यांचा पुरस्कार करणाऱ्या घरात ती वाढलेली असते. त्यामुळे या सगळ्यापेक्षा वेगळं असं काहीसं रिबेल, स्वछंद आयुष्य ती जगत असते. सगळ्या गोष्टींमध्ये नको असलेल्यापासून सुटका, विश्वासघात करणे याला ती प्राधान्य देते. तिचं म्हणणंच असतं:
"From tender youth we are told by father and teacher that betrayal is the most heinous offense imaginable. But what is betrayal?…Betrayal means breaking ranks and breaking off into the unknown. Sabina knew of nothing more magnificent than going off into the unknown." 
तिच्या मते मालकी, आश्वासनं, भावनिक गुंतवणूक ह्या सगळ्या बोजड गोष्टी आहेत. त्यांचा दर्जा 'किश(kitsch)' म्हणजेच सुंदरतेचा अभाव असलेल्या , poor taste (because of excessive garishness or sentimentality) असलेल्या गोष्टी आहेत. सबिना आपल्या कलेत किश(kitsch)चा अंतर्भाव कधीही असू नये याची खबरदारी घेत असते, त्याचबरोबर आयुष्यातही किश(kitsch)चा अंतर्भाव असू नये असेच तिचे ठाम मत असते. त्यासाठी ती कुठलंही टोक गाठायला तयार असते. यासाठीच ती आपला प्रियकर फ्रान्झ याला सोडून निघून जाते. सामाजिक नियम, डोमेस्टिकेशन सोडते, देशही सोडते. कुणीही तिच्यावर हुकूमत गाजवणे तिला मंजूर नसल्याने ती तसं न होऊ नये यासाठी 'Betrayal(विश्वासघात)' चा अवलंब करत असते.

फ्रान्झ हा एक उच्च बौद्धिक क्षमतेचा विवाहित प्रोफेसर असतो. सबिनाशी त्याचे असलेले संबंध त्याला उघडपणे कधीच स्वीकारता येत नाहीत. राहत असलेल्या शहरात तिच्याशी संबध ठेवायला तो कचरत असतो म्हणूनच व्याख्यानाच्या टूर्स करून तो सबिनाला आपल्याबरोबर घेऊन जात असतो. अद्याप स्वतःच्या शहरात (बायकोबरोबर राहत असलेल्या) मात्र त्याला सबिनाशी संबध ठेवणे शक्य झाले नसते. तो शेवटी हि गोष्ट बायकोपाशी कबुल करतो. पण जेव्हा त्याची ही भावनिक गुंतवणूक (सबिनाला बोजड वाटणारी) सबीनाला कळते तेव्हा ती त्याच्यापासून दूर निघून जाते. सबिना गेल्यावर तो एका विद्यार्थिनीशी संबध ठेवतो पण तरीही कायमस्वरूपी सबिनाचीच मनाने भक्ती करत राहतो. फ्रान्झ हे ही एक गुंतागुंतीचे पात्र. तेरेझा प्रमाणेच जडत्वात राहणारे. तो डाव्या विचारसरणीचा पुरस्कर्ता असतो. त्याला राजकारण, प्रोसेशन्स, मार्चेस (मोर्चेबाजी) यात रस असतो. शेवटी बँकॉक  येथे त्याचा हकनाक बळी जातो. त्याच्या मृत्यूनंतर त्याला घटस्फोट न दिलेली त्याची बायको त्याचा मृतदेह ताब्यात घेते.

या पुस्तकात गोष्ट अशी नाहीच, हे संकल्पनांचे(Ideas)चे पुस्तक आहे. या संकल्पनांचा पाया तत्वज्ञानावर आधारलेला आहे. यात खूप खोलवरचे  चित्रण असलेल्या पात्रांतून लेखक काय शोधतो आहे? तर जगण्याचे संदर्भ. जगण्याची परिमाणं. माणूस जगण्यात 'लाईटनेस' चा अवलंब करतो किंवा वेट(हेवीनेस) चा.
'लाईटनेस' म्हणजे हलकं-कुठेही कशाच्याही संपर्कात न येणारं. अलिप्त, विरक्त, निर्विकार.
'हेवीनेस/वेट' म्हणजे जडत्व. जे संपर्कात येतं. जे मिसळून जातं. ज्याला अलिप्तता ठाऊक नाही.

'लाईटनेस' आणि 'वेट(हेवीनेस) यातलं कुठलं चांगलं म्हणायचं? ते अद्याप ठाऊक नाही.
या पुस्तकात लेखकाने या दोन संकल्पना आणि त्यांच्यावर आधारलेलं या चार व्यक्तींचं जीवन रेखाटलं आहे.
टॉमस, सबिना - लाईटनेस (थोड्या फार फरकाने) आता त्यांना लाईटनेस चे उदाहरण म्हणायचे का ? हा प्रश्नच आहे.
तेरेझा, फ्रान्झ - वेट/हेवीनेस , यांना मात्र वेट /हेवीनेसचीच उदाहरणं म्हणता येईल.

लाईटनेस म्हणजे कशाशीही चिकटून न राहणे. जीवनात ही संकल्पना अवलंबता येते का? आणि तशी अवलंबताना माणसाचे काय होते? त्याला तसे खरेच जगता येत असेल का? हे प्रश्न पुस्तक वाचताना सतत पडत राहतात. लेखकाला 'लाईटनेस' चे आकर्षण आहे. पण त्याने पुस्तकाचे  नाव दिले आहे 'अनबिअरेबल लाईटनेस ऑफ बीइंग'
म्हणजे हा 'बीइंग' चा 'लाईटनेस' अनबिअरेबल आहे. असहनीय आहे. का?  त्याचे उत्तर मात्र लेखक देत नाही. कारण ते उत्तर कोणीही दुसऱ्याला देऊ शकत नाही. तशी उत्तरं लेखकाच्या पात्रांना म्हणजे टॉमस, सबिना, तेरेझा, फ्रान्झ यानांही सापडत नाहीत. शोध जरूर घेतात. टॉमस, तेरेझा, फ्रान्झ यांचा शोध तोडला जातो, संपतो, तो त्यांच्या मृत्यूमूळे. पण सबिना, ती 'लाईटनेस' चे आत्यंतिक टोक गाठण्याचा प्रयत्न करते, पण तिला तरी काही सापडते का ? तर बहुदा नाही. तिच्या 'लाईटनेस'चा अवलंब करून जगण्याला तरी 'लाईटनेस' म्हणायचे का?
खरा 'लाईटनेस' म्हणजे काय? ती स्थिती कोणती? आणि ती कशी साधायची हेच माहित नाही. याचे ज्ञान कोणीही देऊ शकत नाही, म्हणून अंधारात चाचपडत जे जे 'लाईटनेस' च्या नावाखाली अवलंबता येईल ते ती अवलंबत जाते. पण अखेर तिलाही तसे जगणे साध्य होते का?

हे पुस्तक फार क्लिष्ट आहे. कारण याच्यामध्ये मोकळे सोडून दिलेले अनेक धागे दोरे आहेत. घरंगळणारी रीळं आहेत. अर्थ जसा लावावा तसे फिरणारे शब्द आणि संकल्पना आहेत. त्यामुळे हे पुस्तक वाचता येईल पण समजता येईल की नाही हे सांगणे कठीण. वरवरची गोष्ट कळते. तिच्यात सुसूत्रता आहे. ती शेवटापर्यंत देखील पोचते, पण तरीही गोष्टीच्या खालून वाहणारा प्रवाह लांबच लांब पोहोचतो. त्या अथांग समुद्राच्या दूरवर दिसणाऱ्या क्षितिजावरल्या पाण्यासारखा. आणि दहा पावलांवरच तो खोल होत जातो. क्षितिजापर्यंत तर खूपच खोल. ही लेखकाचीच अवस्था आहे. आणि एकंदरीत माणसाचीच अवस्था. लेखक म्हणतो 'लाईटनेस आणि वेट या मधील कुठचं चांगलं? कुठचं सकारात्मक आणि कुठचं नकारात्मक? कोण जाणे? पण ज्या ज्या काही सकारत्मक-नकारात्मक जोड्या आहेत (Good-Evil, Black-White, Softness-Coarseness etc etc) त्यातले लाईटनेस आणि वेट हे सगळ्यात गूढ आणि अनाकलनीय संयोजन (कॉम्बिनेशन) आहे.

मी स्वतः अत्यंत 'जडत्वात' राहणारी व्यक्ती आहे. माझ्या जवळपास घडणाऱ्या गोष्टींशी माझा नकळत आंतरिक संबंध निर्माण होतो. मी इगोने पछाडलेली. टोकाची भावनिक. माझ्याजवळ एखादी छान दिसणारी प्लास्टिकची पिशवी जरी काही काळ राहिली तरी मी त्याच्याशी संबध जोडून मोकळी होते. मला ती टाकणे जिवावर येते. त्याच्यात माझ्या भावना गुंततात. मला एक कागदाची स्ट्रीप आठवते 'या चित्राला हात लावू नये' असे लिहिलेली.  ती कागदाची स्ट्रीप मी माझ्या पुण्यातील घरी असताना काढलेल्या ओल्या चित्रावर(ते खराब होऊ नये म्हणून) अडकवून ठेवली होती. ती स्ट्रीप मला त्यानंतर दोन वर्षांनंतर कुठेतरी सापडली तर मी ती अजून कचऱ्याच्या डब्यात टाकू शकले नाही कारण मला त्या स्ट्रीपला बघून त्या घरातले माझे वास्तव्य आठवते. आता याला कुठच्या टोकाचे 'जडत्व' म्हणावे? मी 'जडत्व' या गोष्टीपासून पळत असते. भौतिक गोष्टींपासून सुटका बरीच केली आहे पण हे 'जडत्व' भौतिक नाहीच हे मला जाणवू लागले आहे. खरे 'जडत्व' मनात आहे, त्याचे काय करायचे? 'गोष्टींची हाव/इच्छा' म्हणजे जडत्व नव्हे. मला तशी हाव नाही, इच्छा नाही. पण सगळे असून, त्यात असूनही, सगळ्याबाबतीत लागणारी एक जी निर्विकार वृत्ती लागेल ती माझ्यात नाही. तशी निर्विकार वृत्ती बाळगून जगणे म्हणजे खरे जगणे? की सगळ्याचा आस्वाद घेत, त्यात आकंठ बुडत राहणे, आणि त्याशिवाय दुःखी होणे, झुरणे म्हणजे जगणे? या दोन टोकांमधली मधली  ओढाताण मात्र जीवघेणी आहे. जे एका टोकाला असतात त्यांचे बरे असते पण जे या दोन टोकांमध्ये अधांतरी असतात त्याची प्रचंड फरफट होते. आणि असेही नाही की जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्ही सतत एका टोकावर असाल. तुमची स्थिती कायम बदलत असते.

या पुस्तकातून मनात घरंगळलेला  काही ऐवज :

रिपीटेशन  अँड स्ट्रेट लाईन
माणूस सरळ लाईन मध्ये चालतो. त्याला वर्तुळाकार फिरून परत जागेवर येणे रुचत नाही. त्याला ते पटत नाही. रिपीटेशन आवडत नाही. 

या पुस्तकात एक प्रसंग आहे. कॅरेनिन आणि तेरेझा यांचे कॅरेनिनसाठी दोन रोल(खाणे) विकत घेऊन येणे आणि घरी आल्यानंतर कॅरेनिनकडून  खोटाखोटा रोल हिसकावून घेण्याचा आव आणणे आणि त्याने तो मिळवण्यासाठी खटपट करण्याचा खेळ खेळणे. शेवटी कॅरेनिनला कॅन्सर होतो आणि त्याचा पाय कापावा लागतो. कॅरेनिन जेव्हा अखेरचे क्षण मोजत असतो, तेव्हा त्याला दिलेला रोल खाताना आणि दुसरा रोल तेरेझा आणि टॉमसने (लुटुपुटुचंच)हिसकावून घेतल्यावर कॅरेनिन तो परत मिळवतो आणि तोंडात धरून त्यांच्याकडे  विजयी मुद्रेने पाहतो तेव्हा तेरेझा आणि टॉमस खुश होतात. 'म्हणजे याने जगण्याची आशा सोडून दिली नाहीये तर! असे त्यांना वाटते. तेव्हा टॉमस तेरेझाला म्हणतो 'त्याला रोज रोज तू तोच रोल देत होतीस आणि तोही आनंदून तो रोल तोंडात घेई. दुसरा  रोल आपण त्याच्याकडून काढून घेतल्यासारखे करु, मग तो स्वतः तो रोल खटपट करून(फक्त त्याच्या दृष्टीने, आपल्यासाठी ती 'कॅरेनिन' ला खेळता यावं म्हणून केलेली खोटी-खोटी खटपट) तो रोल मिळवत असे आणि विजयी मुद्रेने तोंडात घेऊन आपल्याकडे बघत असे.  कॅरेनिन तेवढ्यावर खुश होता पण तसं तू माणसाशी केलंस तर तो दुसऱ्या दिवशी कंटाळेल आणि सांगेल मी तुझ्या या त्याच त्याच रोल ने, आणि रोलच्या त्याच त्याच खेळाने बोर झालो आहे.
जी. एंच्या पिंगळवेळ या पुस्तकाच्या सुरवातीच्या पानावर एक वाक्य आहे Strindberg चे
Shallow people demand variety- but I have been writing the same story throughout mu life, every time trying to cut nearer the aching nerve.
जी. एंच्या पुस्तकातही तेच तेच रेपीटेटिव्ह थिम्स येतात. किंबहुना वैयक्तिकरित्या आपण जे शोधत असतो ते रिपीटेटिव्ह असतं. रिपीटेटीव्हली काही गोष्टींचा पाठपुरावा आपण करत असतो, म्हणून आपण सोडून इतरांत मात्र आपल्याला नॉनरिपीटेटिव्ह नाविण्य हवं असतं. हे माणसाचं खरं दुखणं. प्राण्यांचं तसं नाही. 'रुटीन' हेच त्यांचे आयुष्य. 'नाविण्य' त्यांना ठाऊकच नाही.

कुत्रा आणि माणूस 
"True human goodness, in all its purity and freedom, can come to the fore only when its recipient has no power. Mankind's true moral test, its fundamental test (which lies deeply buried from view), consists in its attitude towards those who are at its mercy: animals. And in this respect mankind has suffered a fundamental débcle, a débcle so fundamental that all others stem from it." 

हेवीनेस (जडत्वाने जगणे) आणि जड बॅग, जड कथेचं ' ऍना कॅरेनिना'पुस्तक 

तेरेझा जेव्हा टॉमस ला भेटायला प्रागला येते तेव्हा ती ' ऍना कॅरेनिना' (लिओ टॉलस्टॉयचं) हे पुस्तक बगलेत घेऊन आलेली असते. तिच्याशी भावनिकरित्या गुंतला असला तरीही टॉमस आपले  स्वछंदी आयुष्य सोडू इच्छित नाही. त्याला ते 'ड्रिफ्टिंग'/lightness ने परिपूर्ण आयुष्यच हवं असतं. स्वतःला तेरेझाच्या भावनिक विळख्यातून सुटका मिळावी म्हणून तो एक कुत्रा घेण्यास राजी होतो. जेणेकरून तेरेझाच्या भावनिक गरजांचा डोंगर त्यांच्या एकट्यावर कोसळणार नाही, ती female dog असते. टॉमस या  कुत्रीचे 'कॅरेनिन'  असे पुरुषी नाव ठेवतो. या आशेने की 'कॅरेनिन' तेरेझाशी भावनिक नाते जोडेल. बहुतेकदा कुत्र्यांमध्ये विरुद्ध लिंगी मालकाशी जास्त जवळिकीचे नाते असते असे म्हटले जाते. (पुरुषी नावामुळे 'कॅरेनिन' हिच्यामध्ये पुरुषी गुण उत्पन्न होतील ) आणि खरोखरीच तसे होते. 'कॅरेनिन' तेरेझाशी जवळीक साधते. तेरेझाचे पुस्तक बगलेत घेणे आणि  'कॅरेनिन' शी खोलवरचे नाते जोडणे (कॅरेनिनला  बगलेत घेणे) सलग्न आहे. कुणाशीही जवळीक नको असलेल्या टॉमसला प्रत्येक गोष्टीशी जवळीक साधणाऱ्या आणि जडत्वात राहणाऱ्या तेरेझापासून 'कॅरेनिन' मुळेच स्पेस मिळते. 

तेरेझाची स्वप्नं
तेरेझची स्वप्नं हा पुस्तकाचा एक तरल भाग आहे. तिला दुःस्वप्न पडतात. शरीर आणि शारीर गोष्टींबाबत तिच्यामध्ये असलेली, खोलवर दडलेली घृणा तिच्या स्वप्नांतून वेगवेगळी रूपं घेऊन येत राहते. टॉमसचे तेरेझासमावेत इतर  अनेक नग्न स्त्रियांना मार्च करण्याची आज्ञा देणे आणि त्यातील न रुचलेल्या स्त्रियांना गोळी घालून मार्च करत असलेल्या प्लॅटफॉर्मच्या बाजूच्या स्विमिंग पूलमध्ये पाडणे असं एक स्वप्न. 

कॅरेनिन गिव्हज बर्थ टु रोल्स अँड या बी  
दुसरं स्वप्न 'कॅरेनिन' दोन खाण्याचे रोल्स आणि एक माशी याना जन्म देते. समजायला कठीण अशी ही स्वप्न. पण तिच्या आणि एकंदरीत 'जडत्व' घेऊन जगणाऱ्या व्यक्तींच्या मनात खोलवर रुतलेल्या संकल्पनांचे रूपच हि स्वप्नं असावीत. 

बोवलर हॅट : बोवलर हॅट घातलेली नग्न स्त्री स्वतःचे रूप आरशात बघत असते हे नक्की कशाचे प्रतीक आहे. मिलन कुंदेरा याना अशी रुपकं घेऊन काय मांडायचे आहे याचा विचार करण्यासाठी हे पुस्तक मला पुन्हा वाचावे लागेल  बहुतेक. 

Ess muss sein, or "It mu st be." आणि बेथोव्हेन
बीथोवेनचे संगीत आणि त्याने वापरलेली फ्रेज 'Ess muss sein, "It mu st be." या पुस्तकातील पात्रांच्या (विशेषतः टॉमसच्या) आयुष्याशी अतिशय संलग्न आहे. 
Ess muss sein, or "It mu st be."
Tereza also introduces Tomas to Beethoven and the profound heaviness of his music. In add ition, the novel Tereza reads when she first arrives and after which the couple name their dog is Anna Karenina. This novel, with its tragic tale of love, suffering and suicide both foreshadows the kind of love Tereza offers Tomas, and hints constantly at the threat of suicide.


किश (kitsch)
किश म्हणजे कलेतील वाईट टेस्ट. कमी दर्जाची कला आणि तिचे संवर्धन करणे, तिची निर्मिती करणे म्हणजे किश. सबिना आयुष्यभर 'किश' पासून दूर पळण्याचा प्रयत्न करते. तिच्यामते जे जे दुय्यम- कमी प्रतीचे ते ते किश. आणि ती 'किश' ही संकल्पना फक्त कलाच नाही तर आयुष्यातही अमलात आणण्याचा प्रयत्न करते. त्यासाठी ती नाती तोडते, देश सोडते. किश म्हणजे नेमके काय याचा अर्थ कादंबरीपुरता लागू शकला तरी आयुष्यातील 'किश' ज्याचे त्याने ठरवायचे.

बुक अँड ब्रदरहूड
तेरेझाचे आयुष्य इतक्या छोट्या खेड्यात गेलेलं असतं आणि ती फार चांगलं आयुष्य जगलेली नसते. तिची विक्षिप्त आणि अश्शील वागणारी आई यापासून सुटकारा मिळवण्यासाठी ती दुसरं जग शोधते ते पुस्तकांत. या पुस्तकांच्या वाचनाने ती स्वतःचं छोटं, कोतं आयुष्य विसरण्याचा प्रयत्न करते. यामुळेच जी लोकं पुस्तकं वाचतात त्यांच्याशी ती  तिचे बंधुत्वाचे नाते जोडत असते. कुणीही पुस्तक वाचताना दिसलं की तिला त्या माणसाच्या चांगुलपणाची खात्री ती स्वतःला पटवून देत असते.

मिलन कुंदेरा हा लेखक प्राग, चेकोस्लोव्हाकियामध्ये १९२९ साली जन्मला. तरुणपणी तो कम्युनिस्ट विचारांचा होता, परंतु १९६८ साली झालेल्या प्राग स्पिंग या घटनेदरम्यान  त्याने कम्युनिस्टविरोधी विचारांचा पुरस्कार केला. प्राग स्प्रिंग ही त्या देशातील एक ऐतिहासिक घटना होती. यामध्ये 'the promise of Socialism with a human face' हे प्राग स्प्रिंगच्या घटनेचे ब्रीद होते. अलेक्झांडर दुबेक यांनी तत्कालीन व्यवस्थेचं अध्यक्षपद स्वीकारलं. पण ही घटना शेजारच्या रशियाला काळातच त्यांनी प्रागमध्ये टँक्स, लष्करशाहीचा अवलंब केला आणि चेकोस्लोव्हाकियामध्ये रशियन ट्रूप्सनी कब्जा केला. यानंतर कुंदेरा यांच्याही स्वतःच्या विचार, वक्तव्यावर बंधनं घालण्यात आली होती, त्यामुळेच त्यांनी पुढे देश सोडून पॅरिस येथे वास्तव्य केले.
या पुस्तकातील टॉमस या व्यक्तिरेखेतील काही भाग कुंदेरा यांनी स्वतःच्या आयुष्यातून घेतला आहे. टॉमसला आपल्या एका लेखासाठी तत्कालीन राजव्यवस्थेची  मागण्याचा प्रस्थाव येतो, तो न स्वीकारल्याने आणि विरोधक पक्षांच्या बाजूनेही सहमती न दर्शवल्याने टॉमसला आपली  प्रतिष्ठित सर्जनची नोकरी गमवावी लागते आणि त्याला खिडक्या साफ करण्याचे काम पत्करावे लागते.

पुस्तक झेक(Czech) भाषेतून इंगजीत Michael Henry Heim यांनी अनुवादित केलं आहे. या पुस्तकावर आधारित एक चित्रपटही  दरम्यान आला होता. पण हा चित्रपट कुंदेरा यांच्या पुस्तकापेक्षा इतका वेगळ्या पद्धतीने मांडला गेला, आणि मूळ संकल्पनांशी इतका फारकत घेणारा ठरला की पदरी पडलेल्या निराशेने कुंदेरा यांनी आपल्या कुठल्याही पुस्तकावरून  चित्रपट काढण्याला सक्त मनाई केली.